चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील उसाच्या उत्पादनात ३० टक्के घट होणार असल्याचा निष्कर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. याचे सादरीकरण गुरुवारी पुण्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ५ ते १५ आॅगस्ट या काळात अभूतपूर्व असा महापूर आला होता. त्यामध्ये तिन्ही जिल्ह्यांतील ४.९ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली होती. यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र उसाचे आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पथकांनी या तिन्ही जिल्ह्यांतील पूरबाधित ऊस क्षेत्राची पाहणी करून सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या आधारे काढलेल्या निष्कर्षाचे सादरीकरण शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यामध्ये पूर्णपणे वाया जाणारे ऊस क्षेत्र तसेच अंशत: बाधित क्षेत्राची माहिती देतानाच हा ऊस वाचविण्यासाठी किंवा या पिकावरील संभाव्य रोगराई टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांचाही समावेश होता. महापुरामुळे उसाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होईल. पर्यायाने साखर उत्पादनही ३० टक्क्यांनी घटेल, असा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हे अद्याप अपूर्णहा सर्व्हे अद्याप पूर्ण झालेला नाही. शिरोळ तालुक्यातील दानवाड, खिद्रापूर तसेच जवाहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पुराच्या पाण्याखाली गेलेले ऊसाचे काही क्षेत्र अद्यापही दलदलीचे आहे. त्यामुळे तेथील सर्व्हे पूर्ण होण्यास आणखी आठदहा दिवस लागतील .त्यानंतरच ऊसाच्या नुकसानीचा अंतीम निष्कर्ष सांगता येईल.राज्याचे साखर उत्पादन ६० लाख टनांपर्यत घसरणार२०१८-१९ च्या हंगामासाठी राज्यात ११ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. या हंगामात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. दुष्काळामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र यंदा ८ लाख ४३ हजार हेक्टरवर आले आहे. त्यात आता महापुराचा फटका बसला असल्याने त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ६० टनांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महापुरामुळे ऊस उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:00 AM