सुनील चौगले --आमजाई व्हरवडे --देशात एकेकाळी अव्वल स्थानावर असणारा भोगावती साखर कारखाना दोनशे कोटी कर्ज, जादा नोकरभरती यामुळे आर्थिक गाळात रूतला आहे. आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी चालू हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेर जात असलेला ऊस पाहता पाच लाखांचा टप्पा तरी पूर्ण होणार काय? ही शंका आहे. जर पाच लाख टनांचा टप्पा पूर्ण झाला नाही, तर ‘भोगावती’चा पुढील गळीत हंगाम धोक्यात येऊ शकतो.साठ वर्षांपूर्वी कै. दादासाहेब पाटील (कौलवकर) यांनी भोगावती कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यामुळे बावन्न गावांतील जनता सुखी झाली. त्यांच्या पश्चात (कै.) गोविंदराव कलिकते यांनी कारखान्याचा कारभार चांगला केला. कलिकते यांच्यानंतर सुद्धा दादासाहेबांचे पुत्र दिवंगत आनंदराव पाटील (कौलवकर) यांनी दहा वर्षे कारभार केला. कारखान्याला पुरस्कार मिळाले. मात्र, अलीकडच्या दहा वर्षांच्या राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी कारखान्याला आर्थिक संकटात घातले आहे.कारखान्यावर सध्या दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचा आरोप होत आहे. भोगावतीची जंबो नोकरभरती गाजली. त्यामुळे महिन्याला दोन, सव्वादोन कोटींचा बोजा पडणार आहे. कदाचित राज्यात सर्वाधिक पगार व बोनसवर खर्च होणारा ‘भोगावती’ असेल. दोन्ही काँग्रेसच्या राजकारणाने मार्च २०१६ ला भोगावतीवर प्रशासक मंडळ आले.साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशासकाच्या नेतृत्वाखाली गळीत हंगाम सुरू झाला आहे. अनेकांनी या भोगावतीवर स्वार्थ साधला अशी मंडळी सध्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. सध्या भोगावतीच्या कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे तोडून नेला जात आहे. या कार्यक्षेत्रातील ऊस जिल्ह्यातील सहा कारखान्यांना जात आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र चाळीस टक्क्यांनी घटले आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता या कारखान्याला साडेपाच लाख टन ऊस गाळप होण्याची गरज आहे. सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून उसाचे गाळप जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे. प्रशासकांचे शर्थीचे प्रयत्न‘भोगावती’चे प्रशासक संभाजीराव निकम कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, कारखान्यावर लाखोंची माया कमावणारे काही चार-पाच अधिकारी प्रशासकांना चुकीचे मार्गदर्शन करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासकांनीही या अधिकाऱ्यांना किती जवळ घ्यायचे, ही त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. भरमसाट झालेली नोकरभरती, काहीजणांना झालेली प्रचंड पगारवाढ व बढती यामुळे तर कारखाना रसातळाला निघाला आहे. त्यामुळे कारखान्याला वाचविण्यासाठी प्रशासकांना सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे.
‘भोगावती’ कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 12:39 AM