गडहिंग्लज : मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ऊसतोडणी मजुराने येथील चार मजली इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याला वाचविले. उमेश भाऊसिंग चव्हाण (वय २८, रा. लोहरा-इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांची टोळी गडहिंग्लज तालुक्यात आली आहे. ऐनापूर येथे त्यांचे ऊसतोडणीचे काम सुरू आहे. त्यामध्ये उमेश व त्याची पत्नी निशा व मेव्हुणा अनिल राठोड हेही मजुरीसाठी आले आहेत.शुक्रवारी (६) रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण झोपी गेले होते. दरम्यान, उमेश हा अचानक झोपेतून जागे झाला आणि मोठ-मोठ्याने बडबडत इकडे-तिकडे पळापळ करू लागला. नातेवाईकांनी एका मोटरसायकलीवरून त्याला उपचारासाठी गडहिंग्लजला आणले. त्यावेळी त्याने दुचाकीवरून उडी मारली. येथील जागृती हायस्कूलनजीक बांधकाम सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जावून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, शेजारील रहिवाशी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी पोलिस व पालिकेच्या अग्निशमन दलास बोलावून घेतले. प्रसंगावधान राखून स्वत: त्या इमारतीच्या गच्चीवर गेले आणि गनिमीकाव्याने त्याला आत्महत्येपासून रोखले. तब्बल तासभर हा थरार सुरू होता. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नातेवाईकांची तक्रार नसल्यामुळे रात्री उशीरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद झाली नव्हती.वाचविणाऱ्यांचीही घाबरगुंडी..!चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाºया उमेशला खाली उतरण्यासाठी त्या इमारतीवरील कामगार व नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु, दगडफेक करीत त्याने त्यांनाही आपल्याजवळ येवू दिले नव्हते. अगदी पॅराफीटच्या काठावर हातात दगड घेवून तो आरडा-ओरडा करीत होता. परंतु, नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली.