गारगोटी : कमिशन न देता रस्त्याचे काम सुरु केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव यांनी चारपाच गुंडांना सोबत घेऊन कंत्राटदाराची स्विफ्ट कार फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली गारगोटीत घडली आहे.याप्रकरणी कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी भुदरगड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तर रस्त्याचे काम करण्यासाठी सत्यजीत जाधव यांना सात टक्के कमीशन न दिल्याच्या कारणावरून भाडोत्री गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे.पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, आशिष पोवार व शक्तीसिंह सारंग यांची रस्त्यांच्या कामात भागीदारी आहे. त्यांनी भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ व सोनुर्ली कामाचे जिल्हा परिषदेचे टेंडर ऑनलाइन पद्धतीने कमी दराने भरले होते. यावेळी सत्यजीत जाधव यांनी सात टक्के कमीशनची मागणी केली होती.आज शुक्रवारी(दि.१७) दुपारच्या सुमारास ते कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सत्यजीत जाधव यांचे स्वीय सहायक (पीए) एकनाथ धनाजी वरंडेकर त्याचा भाचा गणेश पंदारे व इतर पाच सहाजणांनी हातात काठया व हत्यारे घेऊन शक्तीसिंह याला अडवून या भागात काम करायचे नाही तर तंगडे मोडून ठेवू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तर जीवे मारण्यासाठी त्यांचा पाठलाग केला.यावेळी गारगोटी येथील जोतीबा मंदिर चौकात मोटरसायकलवरुन आलेल्या एका गुंडाने लोखंडी रॉडने त्याच्या गाडीवर जोरदार हल्ला केल्याची फिर्याद आकुर्डे ता.भुदरगड येथील कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी पोलीसात दिली. दरम्यान सत्यजीत जाधव यांनी कमीशन दिले नसल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे. या घटनेची भुदरगड पोलीसात नोंद झाली आहे.आरोपात तथ्य नाहीयाबाबत माजी उपसभापती सत्यजित जाधव यांनी ठेकेदाराने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले. तर त्यांनी कमिशन मागितल्याचे सिध्द करावे अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.
जिल्हा परिषद सदस्याच्या पतीकडून गारगोटीत ठेकेदारावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 7:58 PM