कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे एका महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राहुल भैरवनाथ पारेकर (वय २०, रा. पांगरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे.राहुल पारेकर हा तळसंदे येथील एका महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. शुक्रवारी त्याचा सी. एम. पी. एस. विषयाचा पेपर होता. या विषयामध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सेमिस्टरमध्ये तो अनुत्तीर्ण झाला होता. शुक्रवारीही त्याला पेपर अवघड गेल्याने तो तणावाखाली होता. महाविद्यालयातून खोलीवर आल्यानंतर मित्राला, ‘रात्रीचा जेवणाचा डबा आणून तू खा. मी कोल्हापूरला मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन माझा धनादेश घेऊन येतो,’ असे सांगून तो सायंकाळी सातच्या सुमारास बाहेर पडला.दरम्यान, शनिवारी सकाळी कोल्हापूर रेल्वेस्थानकाजवळ हात-पाय तुटलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. खिशातील ओळखपत्रावरुन हा मृतदेह राहुल पारेकर याचा असल्याचे स्पष्ट झाले.चिठ्ठीतील मजकूरराहुल पारेकर याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये ‘आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. पेपरचा ताण सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला आहे. मला माफ करा. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे नमूद केले आहे.
पेपर अवघड गेल्याने आत्महत्या, रेल्वेखाली उडी घेऊन संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:23 AM