कोल्हापूर : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील उपकेंद्रातील आरोग्य सेवक रमेश धोंडिराम कोरवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची निवड केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळेे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरवी कोल्हापुरातील हरिओमनगरात राहतात. कोरोनाच्या काळात वरिष्ठांकडून झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा त्यांनी चिठ्ठीतून आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझर सुरेश वसंत वरणे यांना ताब्यात घेतले आहे. चिठ्ठीत आणखी काही नावे आहेत का, कोरवींनी चिठ्ठीत लिहिल्यानुसार त्यांना कोणत्या स्वरूपाचा त्रास होता याचा तपास पोलीस करीत आहेत; पण यासंबंधीचा सविस्तर अहवाल प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. शिवाय स्वतंत्र अधिकाऱ्यांतर्फे कोरवीसोबत काम करणारे इतर कर्मचारी, वरिष्ठांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहे. विविध अंगाने चौकशी केल्यानंतर कोरवी यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.