कोल्हापूर : सम्राटनगरातील उच्चशिक्षित तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. प्रीती प्रशांत जैन (वय २२, रा. सम्राटनगर) असे तिचे नाव आहे. नोकरीसाठी दुबईला जाण्यापूर्वीच तिने काही तास अगोदरच आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सम्राटनगरातील प्रीती जैन या तरुणीच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. आई व भावाने कष्टातून तिचे शिक्षण पूर्ण केले. तिने एमबीए (हॉटेल मॅनेजमेंट) शिक्षण घेतले होते. पुढील शिक्षणासाठी तिची कॅनडाला जाण्याची इच्छा होती, पण शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्याने तिने नोकरीचा निर्णय घेतला. नुकतीच तिला दुबईस्थित कंपनीत नोकरीची ऑफर आली होती. शनिवारी (दि. ४) रोजी तिला नोकरीच्या ठिकाणी हजर रहायचे होते, पण विमान चुकल्याने ती पुन्हा कोल्हापुरात परतली. आज, मंगळवारी तिचा मुंबईतून दुबई विमान प्रवास बुकिंग झाला होता. सोमवारी सायंकाळी ती मुंबईला जाणार असल्याने घरात तयारी सुरू होती. दुपारी आई व भाऊ तिचे साहित्य आवरत होते. या कालावधीत प्रीती दुसऱ्र्या मजल्यावर आपल्या बेडरुममध्ये गेली. काहीवेळाने आई तिच्या बेडरुमकडे गेली, बेडरुमचा दरवाजा उघडला असता तिने ओढणीने हुकाला गळफास लावून घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी तातडीने तिचा गळफास सोडवला. बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली त्यामध्ये, वडलांच्या पश्चात शिक्षणासाठी आईला त्रास झाला. माझ्या आत्महत्याप्रकरणी कोणाला जबाबदार धरू नका, कोणाला त्रास देऊ नका असे म्हटले. नैराश्येतून आत्महत्या केली असल्याची शक्यता राजारामपुरी पो. नि. इश्वर ओमासे यांनी व्यक्त केली.
सहकुटुंब ठरले तिचे अखेरचे भोजन
प्रीती सोमवारी सायंकाळी मुंबईला रवाना होणार असल्याने आई, भावाने व नातेवाईकांनी दुपारी तिच्यासोबत एकत्रित जेवण केले. जेवताना नातेवाईकांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. पण तिचे सहकुटुंब जेवण अखेरचे ठरले.