सुजाता दीपक कापरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दीपक, सासरा पांडुरंग गुंडा कापरे (रा. गणपती मंदिराजवळ, कोडोली) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची फिर्याद आनंदा महिपती चौगुले (रा. माले) यांनी दिली होती. तिने वडगावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी (दि.६) उघडकीस आला होता.
सुजाता यांचा येथील दीपक कापरे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता; परंतु तिला सासरच्या मंडळींकडून चार वर्षांपासून त्रास होत होता. घर खर्च चालवावा, काम करून पैसे आणावे, घरातील बाजार भरावा असा सतत तगादा लावला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. सुजाताच्या वडिलांनी तशी तक्रार वडगाव पोलिसांत रविवारी (दि.१७) दिली. कापरे पितापुत्रांनी संगनमत करून मुलीस आत्महत्यास प्रवृत्त केले. तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे, अशी तक्रार नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले करीत आहेत.
विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
वडगाव- भादोले, मिणचे पाणंद रस्त्यावरील दुर्गळे यांच्या शिवारातील विहिरीतच उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शववविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. तपास करताना पतसंस्थेत पैसे भरल्याच्या पावतीवरून मृतदेहाची ओळख पटवली होती.