याबाबत माहिती अशी, बजरंग चौगले हे १०९ टीए बटालियन लष्करात दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे रुजू झाला होता. कबड्डीचा विशेष खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख केला जात असायचा. या खेळात प्रचंड मेहनत घेतच तो लष्करात भरती झाला होता. गेल्या चार दिवसांपासून तो सुट्टीवर आपल्या आवळी बुद्रुक येथे गावी आला होता. सोमवारी प्राथमिक शाळेच्या मैदानावर गावातीलच मित्राबरोबर कबड्डी खेळून घरी आल्यावर सुट्टी संपली असे आई वडिलांना सांगून सोमवारी संध्याकाळी कोल्हापूरला जाण्यास निघून गेला.
मंगळवारी दुपारी एक वाजता बजरंग हा केर्ली जोतिबा मार्गावर एका झाडाखाली थांबून विषारी औषध प्राशन केले व गावातीलच एका जवळच्या मित्राला आपण या ठिकाणी औषध प्राशन केले असे सांगून फोन बंद केला. गावातून चाळीस किलोमीटर अंतर पार करून या ठिकाणी मित्रांना पोहोचण्यास जवळपास दीड दोन तास अवधी लागला. तोपर्यंत हा जवान बेशुद्ध अवस्थेतच पडला होता. मित्रांनी तत्काळ कोल्हापूर येथे सीपीआर हाॅस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल केले होते; मात्र विषाचे प्रमाण जास्त झाल्याने बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविछेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
बुधवारी दुपारी दोन वाजता मृतदेह आवळी बुद्रुक येथे आणण्यात आला. जवान चौगले यांच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
चौकट
आत्महत्या कशासाठी ?
आज सैन्यात भरती होण्यासाठी आजचे तरुण जिवाचे राण करताना दिसत आहेत. भरती झालेले तरुण सिमेवर शत्रूशी लढायलाही तयार असतात; मात्र कबड्डी खेळात प्रावीण्य मिळविलेला बजरंग हा सैन्यदलात कोल्हापुरातच दाखल झाला. आपल्या जिल्ह्यातच नोकरी असताना व सुट्टीला गावी येत असतानाही आत्महत्येचा विचार या जवानाच्या डोक्यात का आला, हे मात्र गुलदस्त्याच आहे.
.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या? या जवानाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या दोघांत सोमवारी वाद झाल्याचे समजते, यातूनच या जवानाने आत्महत्या? केल्याचे बोलले जात आहे.