कोल्हापूर : खाऊगल्लीतील शाहू मैदानाच्या भिंतीला असलेल्या लोखंडी गजास दोरीने गळफास घेऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. दिलीप वसंतराव फाळके (वय ५२, रा. जैन गल्ली, रविवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. आजाराच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा जुना राजवाडा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पहाटे फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेली व्यक्ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत मिळून आल्याने यामागे काही घातपाताचा संशय आहे का? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दिलीप फाळके हे महापालिकेत रोजंदारी कामगार म्हणून सुरुवातीस होते. नुकतीच त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली होती. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ते फिरायला जातो म्हणून घरातून बाहेर पडले. त्यानंतर साडेसातच्या सुमारास नागरिकांना शाहू मैदानाच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे. तेथील लोखंडी पायाडांच्या गजाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यांची ओळख पटली. आत्महत्येच्या काही तासांपूर्वी फाळके यांनी गल्लीतील काही लोकांची भेट घेतली होती. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांना धक्काच बसला. पोलीस हवालदार एन. ए. चौगले यांनी घटनास्थळी व त्यांच्या घरामध्ये त्यांनी काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याची चौकशी केली. पोलीस त्यांच्या आत्महत्येमागे काही घातपाताचा संशय आहे का, याचीही चौकशी करीत आहेत. नगरसेवक विनायक फाळके यांचे ते भाऊबंद आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. (प्रतिनिधी)मरणाची तयारी दिलीप फाळके यांचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मानसिक संतुलन बिघडले होते. ते जवळच्या मित्रांना ‘मला जीवनाचा कंटाळा आलाय. मी मरणार,’ असे बोलवून दाखवीत होते. मित्र त्यांना सावरून नेत होते. आज त्यांनी रात्री झोपतानाच पहाटे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असण्याची चर्चा होती.
महापालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: January 08, 2015 12:53 AM