गडहिंग्लज : प्रेमभंगामुळे आलेल्या नैराश्येतून उच्चशिक्षित तरूणाने घरातील छताच्या पंख्याच्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
राहूल सतीश पाटील (वय २६, सध्या रा. गडहिंग्लज, मूळगाव रा. गिजवणे) असे त्याचे नाव आहे. शनिवार (२५) मध्यरात्री हा प्रकार घडला.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, राहूल याने अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (एम.टेक) घेतली होती. त्यानंतर बंगलूर येथील एका नामांकित कंपनीत तो नोकरीला होता.
दरम्यान, कंपनीतील एका सहकारी तरूणीवर त्याचे प्रेम होते. महिन्यापूर्वी अन्य तरूणाबरोबर तिचा विवाह निश्चित होत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्याने तिच्या घरच्यांशी चर्चा केली. परंतु, त्यांच्याकडून नकार मिळाला. तेंव्हापासून तो निराश होता.
कोरोना लॉकडाऊनमुळे कंपनीने घरातून काम करण्यास सांगितल्यामुळे शनिवार (१८) जुलैला तो गावी आला होता. परराज्यातून आल्यामुळे त्याने शेंद्री माळावरील कोविड सेंटरमध्ये तपासणी करून घेतली होती.कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्याचा स्वॅब घेतला नव्हता.
परंतु, त्याला घरातच क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. त्याचे कुटुंबीय गडहिंग्लज येथील भाडोत्री घरात वास्तव्यास आहेत. त्याचे आजोबा गिजवणे येथील घरात रहात होते. होमक्वारंटाईन राहण्यास सांगितल्यामुळे तो गिजवणे येथील घरी रहायला गेल्यामुळे आजोबा गडहिंग्लजच्या घरी आले होते.
रविवारी (२६) सकाळी बराचवेळ त्याने फोन न उचलल्यामुळे त्याच्या आईने शेजाऱ्यांना चौकशी करायला सांगितले. त्यावेळी त्याने क्वारंटाईनच्या खोलीतच गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. युवराज दळवी यांच्या वर्दीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. हवालदार रवी जाधव अधिक तपास करीत आहेत
कुटुंबियांना धक्का
राहूल हा एकुलता होता. त्याचे वडील एस. टी. महामंडळात नोकरीला होते. दहा वर्षापूर्वी त्यांचेही निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, विवाहित बहिण व आजोबा असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.तीन दिवसात दोन आत्महत्या
शुक्रवारी (२४) शेंद्री माळावरील समर्पित कोविड सेंटरमध्ये लिंगनूर काानूल येथील ३५ वर्षीय निगेटीव्ह तरूणाने भितीपोटी आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच गिजवणेतील उच्चशिक्षित तरूणानेही होम क्वारंटाईनमध्ये आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.