मुलीची मध्यस्थी केल्याच्या गैरसमजातून मेहुण्या-पाहुण्याने केलेली मारहाण व त्यांच्यापासून सततच्या त्रासाला कंटाळून सनी शिवाजी पाटील (वय २५ ) रा. नरतवडे, ता. राधानगरी या तरुणाने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेची फिर्याद त्याचा मामेभाऊ दीपक श्रीपती भोसले यांनी राधानगरी पोलिसात दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.
दत्तात्रय सदाशिव शिंदे (रा.नरतवडे) व अविनाश पाटील (रा.मोघर्डे) या मेहुण्या-पाहुण्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शिंदे यांच्या मुलीने पळून जाऊन लग्न केले आहे. यासाठी सनी शिवाजी पाटील याने त्या दोघांना पळून जाऊन लग्न करण्यास मदत करून मध्यस्थी केली, असा शिंदे यांचा गैरसमज झाला होता. आठवड्यापूर्वी शिंदे व त्यांचे मेहुणे अविनाश पाटील या दोघांनी गावातील सर्व्हिसिंग सेंटरवर नेऊन सनीला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच परत मारून आठवडाभर सतत त्रास त्यांनी दिला होता. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी सकाळी सनी याने तणनाशक प्राशन केले. ही बाब मामेभाऊ व शेजाऱ्यांना कळताच त्याला ग्रामीण रुग्णालय सोळांकुर येथे दाखल केले. त्याची तब्येत फारच बिघडल्याने प्राथमिक उपचार करून त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचार सुरू ठेवले होते; परंतु बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.