सातारा : कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या भावाने विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर दोन तासांच्या अवधीतच लहान भावाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विजय कृष्णात चव्हाण (वय ४५, रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) व जगन्नाथ कृष्णात चव्हाण (४०) अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही भावांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही भावांवर बँकांची मोठ्या प्रमाणावर कर्जे होती. याबाबत कऱ्हाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय चव्हाण हे मूळचे वडगाव हवेली येथील आहेत. कऱ्हाड येथील विद्यानगर परिसरात ते राहतात. कर्जबाजारीपणामुळे सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान त्यांनी विष प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची माहिती नातेवाइकांना देण्यात आली.मृत विजय यांचे बंधू जगन्नाथ चव्हाण यांचा कडेगाव (जि. सांगली) येथील एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. विजय यांच्या आत्महत्येची माहिती समजताच जगन्नाथ हे कडेगावहून कऱ्हाडला येण्यास निघाले होते. भावाच्या आत्महत्येचा त्यांना मोठा धक्का बसला होता. कऱ्हाडला येत असतानाच टेंभूजवळ असलेल्या रेल्वेफाटकाजवळ त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री अकराच्या दरम्यान घडली. या दोन्ही भावांचे मृतदेह कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते.दोघा भावांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाइकांनी व कुटुंबीयांनी आक्रोश केला. या दोघांवरही मोठ्या प्रमाणावर कर्ज होते, त्यांनी दोन-तीन बँकांमधून कर्ज घेतले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. (प्रतिनिधी)
कर्जबाजारी भावांची पाठोपाठ आत्महत्या
By admin | Published: April 04, 2017 1:41 AM