लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : कोरिवळे, ता. कºहाड गावचे रहिवाशी व कोल्हापूर येथील दि कल्याण जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र मोहिते यांनी शनिवारी रात्री उंब्रजमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या कोल्हापूर शहर पदाधिकाºयासह बँकेतील महिला कर्मचारी व अन्य तीन जणांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.उंब्रज येथील एका पेट्रोल पंपालगत शनिवारी रात्री आठच्या सुमारास राजेंद्र मोहिते यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे त्यांच्या आत्महत्येचे गूढ उलगडले.याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र मोहिते हे दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या ताराबाई शाखा कोल्हापूर येथे शाखाधिकारी या पदावर कार्यरत होते. दि. १८ रोजी बँकेच्या व्यवहारात ४०६० रुपयांची कॅश जास्त आली होती. ही कॅश लॉकरमध्ये जमा न करता बँकेतील कर्मचारी दीपाली लगारे यांनी स्वत:कडे ठेवली होती. हा प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्यानंतर शाखाप्रमुख राजेंद्र मोहिते यांनी संबंधित महिला कर्मचारी लगारे यांना परत असे न करण्याची ताकीद देऊन माफीनामा लिहून घेतला होता. त्या कारणावरून दीपाली लगारे तसेच तिचे पती स्वरूप लगारे, सासरे, सासू तसेच शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रज व अन्य कार्यकत्यांनी बँकेत जाऊन मोहिते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच काहीतरी लेखी स्वरूपात लिहून घेतले. त्यानंतर दुर्गेश लिंग्रज याने राजेंद्र मोहिते यांना बँकेच्या बाहेर बोलावून त्यांना पायरीवर बसायला सांगितले. बाहेर जमलेल्या लोकांच्या समोर मारहाण केली. दीपाली लगारे यांच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या तेथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोहिते यांच्याशी उद्धट वर्तन करून मारहाण केली. मोहिते यांना बँकेत स्टाफच्या समोर मारहाण झाल्याचा प्रकार सहन न झाल्याने तसेच बँकेत अपमानित झाल्याने मोहिते यांनी घरी परतताना विषारी औषध प्राशन केले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.गुन्हा दाखल झाल्यानंतर उंब्रज पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले. या पथकाने दुर्गेश लिंग्रजला ताब्यात घेतले आहे.
मारहाणीमुळे बँक शाखाधिकाºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:13 AM