वडगाव हवेली : कर्जाला कंटाळून धाकट्या भावाने विष प्राशन केल्यानंतर मोठ्या भावानेही रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. विद्यानगर व टेंभू येथे सोमवारी रात्री तासाच्या फरकात या घटना घटल्या. दोघांवर बँकांचे साठ लाखांहून अधिक कर्ज असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे. बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळेच या भावांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर १६ तासांनी नातेवाइकांनी ते ताब्यात घेतले.जगन्नाथ कृष्णा चव्हाण (वय ४०) व विजय कृष्णा चव्हाण (३३) अशी आत्महत्या केलेल्या भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली येथील जगन्नाथ व विजय यांनी काही वर्षांपूर्वी शेतीसाठीवसाहतीत सुरू केली. या सर्व शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी दोन बँकांकडून कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्यांनी त्या कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड केली. मात्र, कालांतराने कृषी दुकान व अॅग्रो कंपनी डबघाईस आली. या दोन्हीतून नफा मिळत नव्हता. त्यामुळे व्यापाऱ्यांची देणी, बँकांचे कर्ज, दुकानांचा नफा व शेतीचा खर्च याचा या बंधूंना ताळमेळ जुळवता आला नाही. परिणामी, हे दोन्ही बंधू कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. दिवसेंदिवस कर्जाचा व त्यावरील व्याजाचा आकडा वाढत गेला. कर्जाच्या रकमेची वेळेत परतफेड होत नसल्याने बँकांकडून जगन्नाथ व विजय यांच्या नावे नोटीसही पाठविण्यात आल्या होत्या. मार्च महिना सुरू झाल्यापासून हे दोन्ही बंधू तणावाखाली होते. कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी बँकांकडून सुरू असणारा तगादा व व्यापाऱ्यांचे फोन यामुळे हे बंधू दिवसेंदिवस नैराश्यात जात होते. अशातच गत आठवड्यापासून पैशासाठी त्यांच्यावर ताण आला होता. सोमवारी सकाळी विजय नेहमीप्रमाणे ओगलेवाडी येथील कृषी दुकानात, तर जगन्नाथ हे कडेगाव येथे अॅग्रो कंपनीत गेले. दरम्यान, रात्री सात वाजण्याच्या सुमारास विजय यांनी दुकानाचे एक शटर बंद करून आतच विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर मेहुण्याला फोन करून त्यांनी याबाबतची कल्पना दिली. मेहुण्याने ओगलेवाडीतील काही मित्रांना फोन करून विजय यांच्या दुकानात जाण्यास सांगितले. संबंधित मित्र दुकानात गेले असता विजयने विषारी औषध प्राशन केल्याचे व ते निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मित्रांनी तातडीने त्यांना कृष्णा रुग्णालयात हलवले. काहीजणांनी त्वरित फोन करून याबाबतची माहिती जगन्नाथ यांना दिली. विजयने औषध प्राशन केल्याची व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जगन्नाथ अस्वस्थ झाले असावेत. कडेगावमधून निघाल्यानंतर ते तातडीने रुग्णालयात येतील, अशी नातेवाइकांना अपेक्षा होती. मात्र, जगन्नाथ हे टेंभूमध्ये गेले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर काही नातेवाईक व ग्रामस्थ टेंभू येथे गेले. तसेच पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. जगन्नाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर विजय यांचा मृतदेहही कृष्णा रुग्णालयातून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.
बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळेच ‘त्या’ सख्ख्या भावांची आत्महत्या
By admin | Published: April 04, 2017 11:12 PM