कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१५-२० या कारकीर्दीतील संचालक मंडळाच्या विरुद्ध दाखल केलेला दावा मे. सहकार न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या दाव्यामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. विश्वास नेजदार यांनी निवडणुकीमध्ये बोगस मतदान तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याबाबत थकबाकीचा मुद्दा, गटवार स्वतंत्र मतपत्रिका हे मुद्दे उपस्थित करून अपील दाखल केले होते.
न्यायालयाने यासंदर्भात कायद्यातील तरतुदी, दाखल केलेले पुरावे, लेखी व तोंडी युक्तिवाद विचारात घेऊन सदरचे मुद्दे बेकायदेशीर असल्याने दावा फेटाळला. या दाव्यामध्ये प्रतिवादी कारखाना व संचालकांच्या वतीने ॲड. लुईस शहा यांनी काम पाहिले.
याबाबत मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, सभासदांनी या निवडणुकीत दिलेल्या निर्णयाचा स्वीकार न करता बेकायदेशीरपणे मुद्दे उपस्थित करून निव्वळ राजकीय हेतूने कारखाना व संचालक मंडळास त्रास देणे हा विरोधकांचा उद्देश होता. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे व इतर संचालक उपस्थित होते.