कोल्हापूर : अभूतपुर्व बंडाळीनंतर शिवसेनेत दोन मोठे गट पडले. एकनाथ शिंदेंनी ४० आमदरांसमवेत बंड करुन राज्यात भाजपसोबत सत्तास्थापन केली. अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर पायउतार व्हावे लागले. यानंतर कट्टर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दोन्ही गटाकडून अद्यापही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यानंतर आता दोन्ही गटाकडून गट मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाने अनेक ठिकाणी नव्या जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती देखील केल्या. कोल्हापुरातही शिंदे गटाकडून दोघांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे (शिंदे गट) काेल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सुजीत रामभाऊ चव्हाण (शिवाजी पेठ, कोल्हापूर) व रवींद्र माने (इचलकरंजी) यांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शहरप्रमुख, उपशहर प्रमुखांसह इतर नियुक्त्या लवकरच जाहीर करणार असल्याचे क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सुजीत चव्हाण यांच्याकडे ‘कोल्हापूर उत्तर’, ‘कोल्हापूर दक्षिण’ व ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माने यांच्याकडे ‘शाहूवाडी’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’, ‘शिरोळ’ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, जयवंत हारुगले, शिवाजीराव जाधव, दिगंबर फराकटे, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.टेंभी नाका शिवसेनेचे मुख्य कार्यालयजिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीपत्रावर ‘आनंद आश्रम’ भवानी चौक टेंभी नाका, ठाणे असा पत्ता आहे. याबाबत विचारले असता, सध्या तरी हेच आमचे मुख्य कार्यालय असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापुरात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती, राजेश क्षीरसागरांनी जाहीर केली नावे
By राजाराम लोंढे | Published: August 17, 2022 5:17 PM