कोल्हापूर : ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा कोल्हापूरशी जवळचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. विशेषत: कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात त्या सहभागी होत्या. त्यांच्या आठवणींना सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी आणि कार्यवाह दिलीप बापट यांनी उजाळा दिला.
भावे यांच्या ‘वास्तुपुरुष’ चित्रपटाने २००२ मध्ये फिल्म सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली, तेव्हा दरवर्षी त्यात त्यांचा चित्रपट मराठी विभागात हमखास असे आणि त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान प्रेक्षक पसंती व निवड समितीद्वारा मिळत असे.
‘दहावी फ, नितळ, देवराई, भारत माझा देश आहे, संहिता, देेेेेेेेेेेेेेेेेेेेेवराई, कासव, अखेरचा दिठी’ असे अनेक चित्रपट सोसायटीने दाखवले. २०१७ मध्ये बाबूराव पेंटर स्मृती पुरस्काराने सुमित्रा भावे यांना फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांच्याशी चित्रपट व समाज यावर नेहमी चर्चा होत असे, अशी आठवण सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी सांगितली.
सुमित्राताईंचा ऋणानुबंध जितका कोल्हापूरशी आला, त्यात फिल्म सोसायटीचा सहभाग खूप जास्त होता. कोल्हापूरवर त्यांचे विशेष प्रेम होते. मृदू आवाजात, पण ठामपणे त्या आपल्या चित्रपटाबद्दल मते व्यक्त करत. ‘कासव’ चित्रपटावर फिल्म सोसायटीने चर्चा घडविली असता, त्या जाणीवपूर्वक कोल्हापुरात येऊन चर्चेत सहभागी झाल्या, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले. तसेच प्रयोगशील, समाजभान असणाऱ्या लेखिका, पटकथाकार, दिग्दर्शिका म्हणून त्यांच्याबद्दल फिल्म सोसायटीला आदर असून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात दिलीप बापट यांनी सुमित्राताईंना आदरपूर्वक श्रध्दांजली वाहिली.
कोल्हापूरच्या रसिकांना मिळाले अप्रदर्शित ‘दिठी’ पाहण्याचे भाग्य
आयनॉक्समध्ये चित्रपट महोत्सव दाखविण्यास सुरुवात झाल्यानंतर २०१९ मध्ये ‘दिठी’ हा त्यांचा अजूनही प्रदर्शित न झालेला चित्रपट पाहण्याचे भाग्य कोल्हापुरातील रसिकांना मिळाले. त्यावेळी सुमित्रा भावे यांंचा उद्योगपती नितीन वाडीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला होता. या समारंभाला उद्योगपती व्ही. बी. पाटील, अभिनेता किशोर कदम, निर्माते डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते.
-------------------------------------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
19042021-kol-SumitraBhavekolhapur
फोटो ओळी :
कोल्हापुरात कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१९ मध्ये ‘दिठी’ चित्रपटावेळी दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांंचा उद्योगपती नितीन वाडीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी निर्माते डॉ. मोहन आगाशे आणि चंद्रकांत जोशी उपस्थित होते.