कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी पातळीवरील कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम आणि द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा ५० गुणांसाठी घेण्यात येणार असून त्यासाठी २५ बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर असणार आहे. तो सोडविण्यासाठी एक तासाचा वेळ असणार आहे. या परीक्षांसाठी संबंधित विषयाच्या अभ्यासमंडळांनी निश्चित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करायची आहे. त्याबाबतच्या सूचना कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध अधिविभागांना परीक्षा मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. औषधनिर्माण, विधि, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, वास्तुनिर्माणशास्त्र,अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा समन्वयक महाविद्यालयांकडून घेण्यात येणार आहेत. पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि एम. फिल., प्रि-पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालय आणि अधिविभागांच्या पातळीवर घेतल्या जातील, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा १० ऑगस्टपासून होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:16 AM