कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या श्रीपूजकांसह राष्ट्रवादीच्या दोघा कार्यकर्त्यांना सोमवारी पोलिसांनी समन्स बजावली. ‘आपल्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल असून चौकशीकामी पोलिस ठाण्यात हजर राहावे,’ अशी सूचना त्यामध्ये करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदींची पूर्तता करून त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली. तृप्ती देसाई मारहाणप्रकरणी संशयित आरोपी श्रीपूजक अॅड. केदार वसंत मुनिश्वर, श्रीश रामभाऊ मुनिश्वर, चैतन्य शेखर अष्टेकर, मयूर मुकुंद मुनिश्वर, निखिल शानभाग (सर्व रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर, जयकुमार रंगराव शिंदे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची चाहूल लागताच श्रीपूजक व ‘राष्ट्रवादी’चे दोघे कार्यकर्ते शनिवारपासून पसार आहेत. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत. पोलिसांनी सोमवारी त्यांच्या घरी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून आणखी काही नावे निष्पन्न होतील, त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) कारवाई कराच : दीपा पाटीलकोल्हापूर : अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाई यांनी येऊन गाभारा प्रवेश केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल दीपा पाटील व वैशाली पाटील-महाडिक यांनी न्यायालयात कारवाई करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या, बुधवारी सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बुधवारी (दि. १३) एप्रिलला अंबाबाई मंदिरात येऊन गाभारा प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याबद्दल कारवाई करावी, असा मागणी अर्ज दीपा पाटील व वैशाली पाटील-महाडिक यांनी न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर विचार करून न्यायालय बुधवारी निर्णयाची शक्यता आहे.
श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघांना समन्स
By admin | Published: April 18, 2016 11:50 PM