लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, रविवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने दिलेल्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवत असून सभासदांनी ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेला २०१९-२०२० या आर्थिक वर्षात २ कोटी १४ लाखांचा नफा झाला असून सभासदांना ७ टक्के प्रमाणे लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. मात्र रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना लाभांश वाटप करण्यास निर्बंध आणले आहेत. तरीही बँक वाटपाबाबत पाठपुरावा करत आहे. अहवाल सालात ५७१ कोटी ८८ लाखांचा व्यवसाय झाला असून गतवर्षीपेक्षा ४५ कोटी ७२ लाखाने व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा होत असून आज, शनिवारी दुपारनंतर सभासदांना लिंक पाठवण्यात येणार आहे. ज्या सभासदांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केला नसेल तर त्यांनी नजीकच्या शाखेत जाऊन रजिस्टर करावा, असे आवाहन अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अरूण पाटील, संचालक राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, नामदेव रेपे, जी. एस. पाटील, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, आण्णासाहेब शिरगावे, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, संदीप पाटील, सुमन पोवार, मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, अकाउंटट राजेंद्र चौगुले उपस्थित होते.
दृष्टीक्षेपात बँक
सभासद- ७०९८
ठेवी- ३३६ कोटी ६६ लाख
कर्जे -२३५ काटी २२ लाख
थकबाकीचे प्रमाण - १.२७ टक्के
सीआरएआर - १२.९७ टक्के
ऑडिट वर्ग - ‘अ’