नवी दिल्ली/वारणानगर : श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्या‘सुंदर’ हत्तीला कर्नाटकातील बाणेरगट्टा राष्टÑीय उद्यानात हलविण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश वैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने आज -गुरुवारी आमदार विनय कोरे यांची याचिका फेटाळून लावली. येत्या १५ जूनपूर्वी ‘सुंदर’ ला राष्टÑीय उद्यानात सोडण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील ‘सुंदर हत्ती’ हा आमदार विनय कोरे यांनी जोतिबा देवस्थानास भेट दिला होता. गेली दीड-दोन वर्षे ‘सुंदर हत्ती’बाबत वाद-विवाद होत आहेत. सुंदर हत्तीचा डोंगरावर छळ केला जात असल्याचा आरोप करत ‘पेटा’ या संस्थेने केला होता.सुंदरची जोतिबा डोंगरावरून मुक्तता व्हावी, अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी होऊन सुंदरला तातडीने बाणेरगट्टा राष्टÑीय उद्यानात हलवावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला वारणा उद्योग समूहाचे आमदार विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या सुंदर हत्ती वारणानगर येथे आहे. त्याची अलीकडेच पशुवैद्यकांच्या पथकाने तपासणी केली होती. त्यात साखळदंडाने जखडल्याने सुंदरच्या पायाला जखमा झाल्याचे आढळले होते. दरम्यान, सुंदरची योग्य देखभाल होत नसल्याबद्दल अभिनेत्री सेलिना जेटली आणि पेटाचे नरेश कदम यांनी कालच अनुक्रमे मुंबईतील कुलाबा आणि नवी दिल्लीतील पोलीस ठाण्यात आमदार विनय कोरे यांच्याविरोधात तक्रार नोंदविली होती. कोरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात जगजितसिंग आणि डॉ. नागनाथ यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होऊन ‘सुंदर’ला केरळ येथील बाणेरगट्टा राष्टÑीय उद्यानात १५ जूनपूर्वी हलविण्याचे आदेश महाराष्ट्राच्या वनविभागास दिले. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास वनविभागाच्या संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत संबंधित अधिकार्यांचे शिष्टमंडळ वारणेत ‘सुंदर’ची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
‘सुंदर’ला कर्नाटकात हलवा १५ जूनची मुदत :
By admin | Published: May 30, 2014 1:43 AM