कोल्हापूर: सहकार उपनिबंधक सुनील शिरापूरकर व कोल्हापूर सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गोकूळ शासन नियुक्त संचालक निवडीत हयगय भोवल्याची चर्चा गोकुळ वर्तुळात आहे, तर हातकणंगले तालुक्यातील शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचीही त्याला किनार असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकूळचे शासकीय कोट्यातून संचालक म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. थेट मुख्यमंत्र्यांकडूनच नाव आल्याने त्यांची निवड घोषित केली होती, तथापि आदेश येऊन महिना झाला तरी त्यांना प्रत्यक्ष निवडीचे पत्र मिळाले नव्हते. त्यांच्या नावाच्या घोषणेपुर्वी सहकाय कायद्यानुसार नियुक्तीचे सोपस्कार करणे आवश्यक होते, पण त्याचे पालन झाले नसल्याचे समोर आले आहे. मंगळवारी ही बाब पुढे आल्यानंतर जाधव यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन त्यांचा गोकूळमधील प्रवेश थांबला आहे.या घडामोडी सुरु असताना सहकार दुग्ध विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आल्याने एकच खळबळ उडाली. शिरापूरकर यांची उस्मानाबादचे जिल्हा उपनिबंधक म्हणून बदली करण्यात आली.
कोल्हापूरचे जिल्हा दुग्ध सहाय्यक निबंधक देशमुख यांची बदली झाली आहे, तसे आदेश हातात पडले, मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. त्यामुळे या निमित्ताने गोकूळमधील सत्ताधारी महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली असून शासन नियुक्त संचालक निवडीही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.शिवसेनेच्या एका गटाने विचारला सहनिबंधकांना जाबमुरलीधर जाधव यांची गोकूळ संचालक म्हणून नियुक्ती नियमांच्या, अटीच्या निकषात अडकल्याने लांबणीवर पडली, मात्र आता यावरुन हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या गटातील अतंर्गत संघर्ष उफाळून आला आहे. जाधव यांना मानणाऱ्या गटाने बुधवारी सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांनी कोल्हापुरात भेट घेऊन तुम्ही गोकूळकडे याबाबत का पाठपुरावा केला नाही, प्रामाणिकपणे राबणाऱ्या शिवसैनिकांचा हा अपमान आहे, शिवसेना हे अजिबात खपवून घेणार नाही, अशा शब्दात जाब विचारला.
या शिष्टमंडळात हातकणंगले पंचायत समितीचे माजी सदस्य साताप्पा भवान, शिरोळ उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील, इचलकरंजी नगरसेवक रविंद्र माने, भाऊसो आवळे, अर्जून जाधव, संजय वाईंगडे यांचा समावेश होता.