निपाणी नगरपालिकेसाठी २०१६ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये विलास गाडीवडर यांनी दोन प्रभागांमधील निवडणूक लढवली होती. यामध्ये ते दोन्ही प्रभागांतून विजयी झाले होते. यानंतर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. याठिकाणी त्यांनी आपल्या पत्नी सुनीता गाडीवडर यांना रिंगणात उतरवले होते. काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून सुनीता गाडीवडर यांनी, तर त्यांच्या विरोधात भाजपचे दत्तात्रय जोत्रे यांनी निवडणूक लढवली होती. तिसऱ्या आघाडीकडून सुनील गाडीवडर, तर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने संगीता येडनाईक यांनी निवडणूक लढवली.
स्थानिक आमदार, खासदार व नगरपालिकेची सत्ता भाजपकडे असल्याने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची समजली जात होती. विलास गाडीवडर हे भाजपचे प्रबळ विरोधक म्हणून मतदारसंघात परिचित आहेत. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार ताकद लावली होती. भाजपने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रभागात कामाला लावले होते. यामुळे या निवडणुकीत रंगत आली होती. निवडणूक चुरशीची होणार असे दिसत असतानाच सुनीता गाडीवडर यांनी ९०४ मते घेतल्याने ही निवडणूक जवळजवळ एकतर्फी झाल्याचे दिसून आले. गाडीवडर यांनी १,३६८ पैकी ९०४ मते घेतली. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती; पण जोत्रे यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा धक्का आहे.
ममदापूर येथे काँग्रेस विजयी
ममदापूर, ता. निपाणी येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. लता महादेव मधाळे यांना ३९०, तर भाजपच्या उमेदवार विश्रांती माने यांना १७१ मते मिळाली. अपक्ष असलेल्या शोभा मधाळे यांना १८८ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार लता मधाळे यांनी २०२ मताधिक्य घेतले.
फोटो :
लता मधाळे
सुनीता गाडीवडर