कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने ‘सुपर स्पेशालिटी’ (अतिविशेषोपचार) विभाग सुरू केले आहेत. विविध योजनांत समाविष्ट होणाऱ्या रुग्णांना मोफत तर इतर रुग्णांना माफक दरात ही सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अधिष्ठाता डॉ. लोकरे म्हणाले, सीपीआर रुग्णालयात सुपर स्पेशालिटी अंतर्गत शिशू शल्यचिकित्सा विभाग, मूत्रशल्य चिकित्सा विभाग, मूत्र चिकित्साशास्त्र विभाग, हृदयचिकित्साशास्त्र विभाग, हृदयशल्य चिकित्साशास्त्र विभाग, मेंदूचिकित्सा विभाग, मेंदूशल्य चिकित्सा विभाग, मुख कर्करोग आणि सुघटन विभाग, रक्तविकार, किडनी रोग, इत्यादी विभाग कार्यरत असून, त्याअंतर्गत सर्व तज्ज्ञ निस्वार्थी सेवा बजावत आहेत. प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरांना आठवड्यात ठराविक दिवस ओ.पी.डी. (बाह्य रुग्ण तपासणी) साठी देण्यात आलेले आहेत.सरकारी रुग्णालयात ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात, अशी सर्वसामान्य जनतेची धारणा असते, पण ‘सीपीआर’मध्ये सर्व तज्ज्ञ आपल्या क्षमतेनुसार सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करत असल्याचेही डॉ. लोकरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात सीपीआर रुग्णालयात मेंदूवरील सुमारे १५० हून अधिक शस्त्रक्रिया केल्याची माहिती यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस डॉ. वसंत देशमुख, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. गिरीष कांबळे, डॉ. प्रियेश पाटील, आदी उपस्थित होते.
- १) सर्जरी विभाग : पिडीयाट्रीक सर्जन- डॉ. शिवप्रसाद हिरगुडे, न्यूरो सर्जन- डॉ. अनिल जाधव, डॉ. अनिरुद्ध मोहिते, युरोलॉजिस्ट - डॉ. शिशिर जिरगे, डॉ. राहुल गुणे, डॉ. राजीव कोरे.
- २) मेडिसिन विभाग : न्यूरोफिजिशियन - डॉ. महेश माने, हिमॅटोलॉजिस्ट- डॉ. वरुण बाफना, डॉ. अनिकेत मोहिते, नेफ्रॉलॉजिस्ट- डॉ. रोहित पाटील.
- ३) दंत व मॅक्झीलोफेशियल सर्जरी विभाग : फेसिओमॅक्झीलरी (ओरल आॅन्को व रिकंस्ट्रक्टीव सर्जन)- डॉ. प्रियेश पाटील
- ४) कार्डीयालॉजीस्ट : डॉ. अक्षय बाफना, डॉ. विदूर कर्णिक, डॉ. रोहित श्रीवास्तव, डॉ. युवराज पवार.
- ५) कार्डीयाक सर्जन : डॉ. किशोर देवरे, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. भूपेंद्र पाटील.
व्हेंटीलेटर उपलब्धजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ४ व्हेंटीलेटर उपलब्ध झाली असून, या रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये एकूण ८ व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये एकूण १० इतके व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेडिसीन विभागात ७, स्वाईन फ्ल्यू विभागात १, कार्डीयाक विभागात २, व्हेंटिलेटरचा समावेश आहे.
नियोजन समितीच्या निधीतून येत्या दोन महिन्यांत आणखी १० व्हेंटिलेटर उपलब्ध होत आहेत. तर रोटरी संस्थेने डायलेसिस विभागात ६ व्हेंटीलेटर देण्याचे आश्वासन दिले होते; त्यापैकी दोन दिले.