राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीतच उमेदवारांचा दिवस गेला. प्रत्येक गावात जेवणावळीचा धडाका सुरू असून धाबे, हॉटेल फुल दिसत आहेत. ज्या ठिकाणी हायहोल्टेज लढती आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी’ दर्शन सुरू आहे.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती, त्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८६ ग्रामपंचायतींसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक सोयीच्या आघाड्यांमध्येच लढती होत आहेत. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिल्याने गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जेवणावळीचा धडाका सुरू असल्याने धाबे, हॉटेल फुल झाली आहेत. तरुणांना रोज जेवणाचे कूपन दिले जातात, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. महिला व वयोवृद्ध मतदारांसाठी जेवणाची पार्सल पोहोच होते. रोज जेवणावळी सुरू असल्याने अनेक घरांत एक वेळचे जेवणच तयार करावे लागल्याचे चित्र आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व शहराच्या शेजारील गावात तर हायहोल्टेज लढती पाहावयास मिळत आहेत. येथे जेवणावळीबरोबरच मतदारांना रोज ‘लक्ष्मी’ दर्शन होत आहे. मतदानापूर्वीचा रविवार असल्याने मतदारांच्या गाठीभेटीसाठी उमेदवारांची सकाळपासूनच धडपड सुरू होती. मोठ्या गावात पदयात्रा, थेट गाठीभेटी घेतल्या जात होत्या. महिला उमेदवार हळदीकुंकूच्या निमित्ताने मतदारांच्या भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. संक्रांतीच्या तोंडावरच मतदान होत असल्याने यंदा मतदारांची संक्रांत अधिकच गोड होणार आहे.
सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने आरक्षण नेमके काय पडणार याचा अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती पाहावयास मिळत आहेत.
नात्यागोत्यातील राजकारणाने ईर्षा टोकाला
ग्रामपंचायतीचे राजकारण मुळात भाऊबंदकी, नात्यागोत्यातच आडकलेले असते. त्याला ही निवडणूकही अपवाद नाही. अनेक ठिकाणी चुलत भाऊ, चुलते-पुतणे यासह इतर नाती एकमेकांसमोर उभे असल्याने ईर्षा टोकाला पोहोचली आहे.
मतदान देतो; पण आता थांबा
निवडणुकीत टोकाची ईर्षा असल्याने उमेदवार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रभागातून हलत नाही. छोट्या प्रभागात तर उमेदवार मतदारांच्या घरात दिवसातून तीन वेळा जात आहे. भेटेल तिथे मतदारांचे पाय धरून विनवणी केली जात असल्याने मतदान देतो बाबा; पण आता थांब म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.