कागल नगरपालिका नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभव, जिल्हा परिषद निवडणुकीतही पराभव, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव, असे पराभव पचवून पुन्हा दुसऱ्यादिवशी गैबी चौक ते खर्डेकर चौकातील गणेश हाॅटेलच्या दारात ताठ मानेने उभे राहणारे आणि रस्त्यावर उभे राहून जनतेची कामे करणारे हसन मुश्रीफ कागल शहराने पाहिले आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीत उंची जास्त आणि आवाजही चांगला नाही, असे म्हणून एकेकाळी नाकारलेले अमिताभ बच्चन पुढे सुपरस्टार झाले. आजही नव्या हिरोंना लाजवेल असे काम करीत आहेत. तसाच काहीसा राजकीय प्रवास मंत्री मुश्रीफ यांचा आहे.
सलग पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे आणि ग्रामविकास, कामगार, जलसंपदा, विशेष सहाय्य अशी महत्त्वाची खाती उत्कृष्टपणे सांभाळणारे हे नेतृत्व सामान्य जनतेसाठी ‘राजकीय सुपरस्टार’ आहे. हजारो लोकांचे ते खरे "हिरो" आहेत. वयाच्या पासष्ठीनंरही दोन दोन महत्त्वाची मंत्रिपदे, अहमदनगरचे पालकमंत्रीपद, जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे एकमुखी नेतृत्व अशा विविध जबाबदाऱ्या ते सळसळत्या उत्साहाने निभावत आहेत. हजारो लोकांचा जीव वाचविणारा नायक सिनेमात दाखविला जातो. मंत्री मुश्रीफ यांनी धर्मादाय कायद्यानुसार नोंदणी झालेल्या रुग्णालयांना कायद्याचा बडगा दाखवीत वठणीवर आणले आणि पंचतारांकित रुग्णालये सामान्य गरीब रुग्णांना उपचारासाठी खुली झाली. राज्यात लाखो लोक या योजनेतून उपचार घेऊन मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत बाहेर आले. स्वतः त्यांचे बारीक लक्ष या कामात कायम आहे. म्हणून भारतीय सिनेमात जसा मसिहा दाखविला जातो, तसा मसिहा कागल विधानसभा मतदारसंघातील जनता हसन मुश्रीफ यांच्या कार्यातून पाहात आली आहे. अनिल कपूर यांचा नायक चित्रपट आला होता. त्यामध्ये ते एक दिवसाचे मुख्यमंत्री असतात आणि जाग्यावर टाईपरायटरला पत्र टाईप करायला लावतात. या सिनेमाच्या आधीच असे काम मंत्री मुश्रीफ करीत आले आहेत. उदय पाटील हा टाईपरायटर दौऱ्यात हे मशीन घेऊनच फिरत असे.
भारतीय सिनेमात आपल्या हिरोवर दु:खाचा प्रसंग आला की जनता आक्रोश करते, नवस बोलते, देव पाण्यात ठेवते,तसे भाग्य मंत्री मुश्रीफ यांना लाभले. जेव्हा त्यांना सात वर्षांपूर्वी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा रुग्णालयाबाहेर गर्दी उसळली होती. जोपर्यंत मुश्रीफ रुग्णालयातून डिस्चार्ज घेत नाहीत, तोपर्यंत रुग्णालयासमोरून जाणार नाही, अशी भूमिका अनेक युवकांनी घेतली होती. अडीच वर्षापूर्वी त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली, तेव्हा तर मुजावर गल्लीचे रस्ते जाम झाले. पोलीस कारवाई करून लोकांना बाजूला करावे लागले. तपासासाठी आलेल्या अधिकारी वर्गालाही असा अनुभव पहिल्यांदाच आला असावा. वयोवृद्ध महिला ओक्साबोक्शी रडत होत्या. मंत्री मुश्रीफ यांच्या मातोश्रींचे निधन झाले. या दु:खद प्रसंगात अनेक वृद्ध महिला आपल्या लेकराला कुरवाळावे, अशा कुरवाळत धीर देत होत्या. हे खरे तर एका चित्रपटाच्याही कक्षेत अथवा कॅमेऱ्या फ्रेममध्ये बसणार नाही, असेच दृष्य होते.
सिनेमाचा नायक म्हणजे सर्व संकटांवर मात करणारा आणि सर्वांना न्याय मिळवून देणारा असतो. मंत्री मुश्रीफांनीही अनेक संकटे दु:खाचे प्रसंग, मानापमान पचविले आहेत; पण चेहऱ्यावर ताणतणावही दिसू दिलेला नाही. उलट निराशेच्या गर्तेत सापडून आत्महत्या करायला निघालेल्या काहींना कार्यकर्त्यांनी मुश्रीफांकडे आणले. त्यांनी दिलेल्या धिराने हे लोक नैराश्यातून बाहेर पडले. गेली वीस वर्षे त्यांच्या निवासस्थानी होणारी गर्दी त्यांच्याकडे अनेक कामे घेऊन येत असते. कारण आपला "हिरो" आम्हाला मार्ग दाखविणार हा विश्वास यामागे असतो. खरे तर एक सामान्य तरुण आपले विश्व कसे उभारतो, साम्राज्य कसे निर्माण करतो, यावर चित्रपट असतात. खऱ्या जीवनात हसन मुश्रीफ यांनी मुजावर गल्ली ते मंत्रालय हा गाठलेला प्रवास चित्रपटाच्या कथेसारखाच आहे. पण हा सिनेमा कॅमेऱ्यात टिपण्याएवढा सहजसोपा नाही. तो सिनेमाच्या छत्तीस रिळात बसणाराही नाही. सिनेसृष्टीतील काही हिरो वय वाढेल तसे जवान आणि हॅण्डसम दिसतात. तसे नामदार हसन मुश्रीफ यांच्याबाबत दिसते. आजही ते उत्साही आणि हसरा टवटवीत चेहरा टिकवून आहेत. सिनेमाच्या हिरोला यासाठी मेकअप आणि टाॅनिकही लागते. मंत्री मुश्रीफ यांनाही टाॅनिक लागते; मात्र हे टाॅनिक लोकांच्या गर्दीचे आहे. सभोवताली लोक आणि सतत जनतेचा संपर्क, हीच त्यांच्यासाठी ऊर्जा आहे.