कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या जिल्ह्यातील सडकसख्याहरींवर फक्त दंडात्मक कारवाई न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, आता यापुढे कारवाईचा टप्पा कठोर करा, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निर्भया पथकाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांना दिल्या. सोमवारी पोलीस मुख्यालयात निर्भया पथकाची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी प्रत्येक पथकांच्या कारवाईचा आढावा घेत मार्गदर्शन केले.
तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी निर्भया पथकाची स्थापना ८ आॅगस्ट २०१६ रोजी केली. सध्या कोल्हापूर शहर, करवीर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज व शाहूवाडी अशी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी देण्यात आल्या आहेत. या पथकाद्वारे प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. आलेल्या तक्रारींची शहानिशा करून कारवाई केली जाते.
निर्भया पथकाच्या कामाची पद्धत, मुलींना स्वसंरक्षणाचे शिक्षण, महिलांबाबतच्या कायदेशीर तरतुदीबाबत मार्गदर्शन केले जाते. ज्या ठिकाणी मुली, महिलांची छेडछाड होण्याची शक्यता आहे, अशा १५१ ‘हॉट स्पॉट’ची निवड करून त्याठिकाणी जास्तीत जास्त वेळ पेट्रोलिंग केले जाते.गेल्या सात महिन्यांत महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ११०/११७ नुसार ६६०७ टवाळखोर सडकसख्याहरींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर १५१३१ तरुणांचे समुपदेशन त्यांच्या आई-वडिलांसमोर केले, तर १५५ प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कोळेकर, अंजना फाळके, आदींसह महिला कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.अत्याधुनिक छुपे कॅमेरेनिर्भया पथकास छुपे कॅमेरे देण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून छेडछाड करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी आधुनिक कॅमेºयांचा वापर केला जात आहे. मुली व महिला सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने व निर्भयपणे वावर करण्याच्या दृष्टीने मुली व महिलांची होणारी छेडछाड, पाठलाग करणे, जाणीवपूर्वक महिलांना स्पर्श करणे, त्रास देणे, तसेच मोबाईलवर अश्लील मेसेज करणे अशा व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.नऊजणांवर विनयभंगाचे गुन्हेकाही शाळा-कॉलेजमध्ये मुलींचा पाठलाग करून त्यांचा हात पकडणे, अशा तक्रारी निर्भया पथकाकडे दाखल झाल्या होत्या. अशा नऊ तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये त्यांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. काही विवाहित तरुण मुली व महिलांची छेड काढताना सापडल्याने त्यांच्या पत्नींसमोर त्यांची खरडपट्टी केली गेली.