कोल्हापूर : गर्भातील अर्भकाचे लिंग बदलून मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा सोशल मीडियातून करणारी आणि अवैध गर्भलिंगनिदानासह गर्भपात करणाऱ्या टोळीचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरात सुरू असलेल्या गर्भलिंगनिदान केंद्रांवर छापा टाकून मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.कारवाई दरम्यान पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर घटना स्थळावरून पळाला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अवैध गर्भपातप्रकरणी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील एका हॉस्पिटलवरही कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सोनोग्राफी मशीनचे ज्ञान असलेला टेक्निशियन अमित केरबा डोंगरे (वय ३३, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) याच्यासह एजंट कृष्णात आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईची चाहूल लागताच रॅकेटचा सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) हा घटनास्थळावरून पळाला. या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात सुरू होती. टेक्निशियन अमित डोंगरे याच्या घरातच संशयितांनी गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे केंद्र थाटले होते.शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा करणारी एक जाहिरात जिल्हाधिकारी रेखावार यांना फेसबुकवर निदर्शनास आली. याची माहिती घेऊन कारवाई करण्याची सूचना रेखावार यांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांना दिली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी बनावट महिला रुग्ण तयार केली. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अमित डोंगरे याच्या घरात संबंधित महिलेस औषधांची माहिती देण्यात आली. त्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील ४० हजार रुपये सुरुवातीला, तर उर्वरित ६० हजार रुपये मुलगा झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याने गर्भलिंग तपासणी करण्यासाठी मंगळवारी संबंधित महिलेस बोलावले होते. गर्भलिंगनिदान करून मुलगी असल्याचे त्याने सांगितले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यामुळे गर्भपात करावा लागेल, असे सांगून त्याने ४० हजार रुपयांना गर्भपाताची औषधी देण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी पथक कारवाईसाठी डोंगरे याच्या घरी पोहोचले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच बोगस डॉक्टर पाटील पळून गेला.
पुल्लिंगी पदार्थच खायचेमुलगा होण्यासाठी गर्भधारणेनंतर पहिल्या दोन महिन्यांत सूर्योदयापूर्वी नारळ पाण्यातून गोळ्या घ्यायच्या. रेडा जन्माला आलेल्या म्हशीचे दूध, दही ताक, तूप खायचे. कोंबडी, मासे, अंडी खाणे टाळायचे. शक्यतो पुल्लिंगी पदार्थ खायचे. स्त्रिलिंगी पदार्थ वर्ज करायचे. उजव्या कुशीवर झोपायचे, अशी अनेक पथ्ये सांगितली जात होती.
मशीन, औषधे जप्तपथकाने टेक्निशिनय डोंगरे याच्या घरातून सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या, २० हजार रुपयांची रोकड, अंगारे-धुपारे यासह काही औषधी आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले. त्याने सोनोग्राफी मशीन कोठून आणली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
बोगस डॉक्टरचा कारनामास्वप्नील पाटील हा बोगस डॉक्टर असून, त्याने अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करून लाखो रुपये कमविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. टेक्निशियन डोंगरे याचे शिक्षण बारावी आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट कोर्स झाला आहे. तो शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करतो. तिसरा संशयित कृष्णात जासूद याचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून, तो एजंट आहे. रुग्ण शोधून तो त्यांच्याकडून ४० ते ६० हजार रुपये घेत होता. त्याची पत्नी निगवे दुमाला गावची सरपंच आहे, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
यांनी केली कारवाईनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, महापालिकेचे डॉ. प्रकाश पावरा, ॲड. गौरी पाटील, सामादिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले. करवीरचे पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांच्यासह प्रज्ञा पाटील, योगेश कांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शहनाज कनवाडे, रुबिना पटेल, सचिन देसाई यांनी कारवाईत सहभाग घेतला.