लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ला कोणत्याही परिस्थिती आगामी काळात प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी संघाच्या प्रत्येक सुपरवायझरना त्यांच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांच्या माध्यमातून वर्षाला एक हजार लिटर दूध संकलनात वाढ करण्याची लक्ष्य देण्यात आले. दूध संस्थाना संघाचे महालक्ष्मी पशुखाद्य घेण्याची सक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
‘गोकूळ’चे सर्व विभागप्रमुख व सुपरवायझर यांची मंगळवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना बाजारात अधिक मागणी आहे. मात्र त्याचे मार्केटिंग योग्य पद्धतीने होत नाही. ग्रामीण भागात आपले दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढली पाहिजे, यासाठी प्रत्येक सुपरवायझरने आपल्या कार्यक्षेत्रात किमान पाच दूध व दुग्ध पदार्थ शॉपी सुरू कराव्यात, अशी सूचना अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.
संघाचे महालक्ष्मी पशुखाद्य दर्जेदार आहे, त्याचबरोबर टी. एम. आर. ब्लॉक, फर्टीमिन प्लस, सिल्वर रेशन पॅलेट, लहान वासरांसाठी मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर व फिडिंग पॅकेज उत्पादनेही गुणवत्तापूर्ण आहेत, हे सिद्ध झाले आहे. एनडीडीबीनेही पशुखाद्य गौरवले आहे, यासाठी प्राथमिक दूध संस्थांना आपलेच पशुखाद्य घेण्याची सक्ती कराव्यात, असेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन केले.
संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर यांनी प्रास्ताविक केले. सहायक व्यवस्थापक डी. डी. पाटील यांनी आभार मानले. संचालकांसह कोल्हापूर विभाग, ‘गडहिंग्लज’, ‘बिद्री’, ‘गोगवे’, ‘तावरेवाडी’, चिलिंग सेटर, उदगाव सॅटेलाईट डेअरी, येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
म्हैस दूध उत्पादन वाढीकडे लक्ष
सुपरवायझरनी प्रत्येक दूध उत्पादकाची भेट घेऊन दूध उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहीत करावे. म्हैस खरेदीसाठी संघाच्या योजनांची माहिती देऊन म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
फोटो ओळी : ‘गोकूळ’ चे सर्व विभागप्रमुख व सुपरवायझर यांची मंगळवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक उपस्थित होते. (फोटो-२२०६२०२१-कोल-गोकुळ)