कोल्हापूर : महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ६२ टक्के कृषिपंपांचा वीज पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. महिन्याभरात बाधित ७७ हजारपैकी केवळ २९ हजार कनेक्शन पूर्ववत झाले असून, अजूनही ४८ हजार पंप जाेडणी नसल्यामुळे सुरूच होऊ शकलेले नाही. नद्या, विहिरी तुडुंब भरल्या आहेत; पण पिकांना पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या कडक उन्हामुळे पिकांची पाण्याची गरज वाढली असताना केवळ वीज जोडणी पूर्ववत न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरात २०१९ प्रमाणेच मोठा महापूर आला. यात जिल्ह्यात विजेचे खांब पडल्याने, टीसी, तारा तुटल्यामुळे ३ लाख ४० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या ग्राहकांचा प्राधान्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची यंत्रणा महावितरणने लावली. यातील २ लाख ६२ हजार वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन वेगाने पूर्वपदावर आले. मात्र, याचवेळी कृषीकडे मात्र कांहीसे दुर्लक्ष झाले. नदीकाठावर जाण्यासाठी मार्ग नाही, दलदल आहे, साहित्य शिल्लक नाही असे सांगत या जोडण्या लांबवीत नेल्या. दरम्यान, पावसानेही मोठा खंड दिला. सुरुवातीला बरा वाटणारा हा खंड जसे दिवस पुढे सरकतील तसे नको वाटू लागले. गेल्या चार दिवसांपासून तर कडक ऊन पडत असल्याने तर जमिनी भेगाळू लागल्या आहेत. पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी पिकांना पाणी द्यायचे तर वीज पुरवठाच जोडलेला नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
जिल्ह्यात ७७ हजार कृषिपंपांचे वीज कनेक्शन बाधित झाले होते. त्यातील २९ हजार कनेक्शनची जोडणी पूर्ववत केली असून, तेथेे पाणीपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण, एकूण जोडणी दिलेल्या कनेक्शनपैकी जोडणी नसलेल्या कनेक्शनची संख्या ४८ हजार इतकी आहे.
प्रतिक्रिया
महापुरामुळे नादुरुस्त रोहित्रे बदलून नवीन राेहित्रे, खांब, तारा यांची वाहतूक करणे अशक्य होते. त्यामुळे कृषिपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागत आहे. आता पाण्याची वाढलेली गरज पाहता, संपूर्ण यंत्रणा या कामासाठीच वापरली जात आहे.
परेश भागवत, मुख्य अभियंता, महावितरण