चंद्रकांत पाटील - गगनबावडा -रेशनकार्डअभावी केंद्रशासनाच्या अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना यापासून गगनबावडा तालुक्यातील अनेक नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. तसेच रुग्णांना उपचाराअभावी आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे भ्रष्ट यंत्रणेचा फटका नागरिकांना बसत असून, या योजनेपासून वंचित राहणारे आता तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.पुरवठा विभागाच्या मनधरणीसाठी रेशन दुकानदार गैरमार्गाचा अवलंब करीत आहेत. याबाबत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. अन्नसुरक्षा योजनेतून स्वस्त धान्य सामान्य लोकांना देऊन त्यांची भूक क्षमविण्यासाठी केंद्रशासनाने महत्त्वाकांक्षी अशी योजना हाती घेतली. ही योजना राबविताना दुसरीकडे मात्र रेशन दुकानात आलेले धान्य चढ्या दराने काळ्या बाजारात विकले जात आहे. रेशन दुकानापासून तालुकास्तरापर्यंत व तेथून जिल्हा स्तरापर्यंत पुरवठा विभागाची भ्रष्ट साखळी तयार झाली आहे. सार्वजनिक वितरण यंत्रणेत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. उलट रेशन दुकानदारांचा राजकीय व्यवस्थेसाठी कसा वापर करून घेता येईल, यासाठी काहीजण गैरवापर करीत आहेत. दुकानदारांच्या मागे अधिकारी पैशांच्या मागणीचा ससेमिरा लावत गरिबांच्या हक्काच्या योजनेवर घाला घालण्याचे काम होत आहे. घाऊक व अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्या परवानाधारकांना रॉकेलचा कोटा किती वाटप झाला, किती शिल्लक आहे याची तपासणी का होत नाही? यामागे राजकारण व भ्रष्टाचार हेच प्रमुख कारण आहे. याशिवाय मध्यमवर्गीय आणि त्यावरच्या नागरिकांना रेशन दुकानांशी देणे-घेणे नाही. याचा फायदा घेऊन रेशन दुकानदार त्याचा काळाबाजार करीत आहेत. ४केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे गरीब आणि गरजू सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात अन्नपुरवठा व्हावा, ही अपेक्षा फोल ठरली आहे.४काळ्या बाजारात गहू, रॉकेल विक्री होत असल्याच्या घटना घडूनही याबाबत वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्य, रॉकेल काळ्या बाजारात विक्रीस जात असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.४सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेत भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाई होणे अपेक्षित आहे. पुरवठा विभाग रेशन दुकानदारांना अपुरा धान्यपुरवठा करते, अशी ओरड दुकानदार करीत आहेत.
पुरवठा विभागातील गैरकारभाराने सामान्य त्रस्त
By admin | Published: November 17, 2014 12:14 AM