कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गुºहाळघरांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग आठ तास वीजपुरवठा करण्याचा आदेश वीजवितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम या विषयावर आवाज उठवून पाठपुरावा केला होता.
आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना जिल्ह्यातील गुºहाळघरांना दिवसा सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. करवीर मतदारसंघातील प्रयाग चिखली, वडणगे, शिये, आंबेवाडी, कांचनवाडी, आरळे, बाजारभोगाव, आदीसह अनेक गावांत तीनशे ते चारशे गु-हाळघरे आहेत. या ठिकाणी सुमारे नव्वद हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
येथील उच्च प्रतीचा गूळ संपूर्ण देशात जातो. अनेक गुºहाळघरे सुरू झाली आहेत. गु-हाळघरांना शेतीच्या फिडरमधून वीजपुरवठा होतो. मात्र, अखंडित वीजपुरवठ्याअभावी गूळ निर्मिती प्रक्रियेला बाधा येते. त्यामुळे गु-हाळघरांना सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी करून पाठपुरावा केला होता. आ. पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, वीज वितरण कंपनीने दिवसा सलग आठ तास वीजपुरवठा करण्याचे मान्य केले आहे.