कोल्हापूर : शहरात मागणीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होतो, तरीही नागरिकांच्या पाण्यासाठी तक्रारी का येतात? नगरसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यात वाद का होतात, असा सवाल आमदार जाधव यांनी मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील, जल अभियंता नारायण कुंभार, हर्षजीत घाटगे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उत्तम नियोजन, काटकसर व लोकाभिमुख कारभारातून महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग स्वयंपूर्ण करावा असे आवाहन त्यांनी केले.
शहरात नऊ ते दहा कोटी लीटरची पाण्याची मागणी असतानाही १४.५० कोटी लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तरीही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तसेच काही भागात कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची तक्रार आहे. थेट सायपन पद्धतीने पाणी पुरवठा करण्याऐवजी प्रत्येक भागातील पाण्याची टाकी आधी भरून घ्यावी, त्यानंतर टाकीतून पाणी पुरवठा करावा, असे जाधव यांनी सुचविले.
बालिंगा, पुईखडी, कळंबा व बावडा येथील फिल्टरेशन प्लॅन्टची माहिती घेऊन, या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीबाबत सूचना केल्या. पंप हाऊसची स्वच्छता करून रंगरंगोटी करून घ्यावी, महिन्यातून एकदा फिल्टरेशन प्लॅन्ट व पंप हाऊसची देखभाल दुरुस्ती करावी. अमृत योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
पाणी पुरवठा विभागाला वर्षाला महापालिकेतून पैसे घ्यावे लागतात, हे बरोबर नाही. अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःची योजना म्हणून काम करावे. शिस्त, उत्तम नियोजन, काटकसर व लोकाभिमुख कारभारातून पाणी योजना स्वयंपूर्णच नव्हे तर फायद्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
.
पॉईंटर -
- घरफाळा, पाणीपट्टी थकबाकी दंडात पन्नास टक्के सवलत द्यावी
- बालिंगा पंप हाऊसवरील गळती काढण्यासाठी प्रस्ताव तयार करा.
- ज्या पाण्याच्या टाक्यांना झाकण नाही, ती त्वरित बसविण्यात यावीत.