कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत लॉकडाऊन काळात नागरिकांच्या सोयीसाठी कम्युनिटी क्लिनीक (फिरता दवाखाना) सुरू केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने एक पाउल पुढे टाकत शहरातील झोपडपट्टी परिसरात वैद्यकिय सेवा देण्याचा निर्णय घेउन सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनने मोफत औषधांचा पुरवठा केला.
आयुक्त ङॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कम्युनिटी क्लिनीकसाठी मोफत औषध पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद जिल्हा केमिस्ट असोसिएशनने कम्युनिटी क्लिनीकसाठी लागणारी सर्व अत्यावश्यक औषधे आयुक्त कलशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्याकडे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सुर्पुद केली. यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचीव मदन पाटील , महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, असोसिएशनचे संघटन सचीव सचिन पुरोहित, संचालक सुधीर खराडे, प्रकाश शिंदे, दाजीबा पाटील, संतोष गायकवाड उपस्थित होते.