कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि त्यांच्यावर उपचार करीत असताना लागत असणारे रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. परंतु, दोन दिवसांत राज्यातील सर्व जिल्ह्यांत हा पुरवठा गरजेनुसार सुरळीत होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी दिली.
यड्रावकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेत माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामधील शासकीय अथवा खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण रेमडेसिविरची मागणी याचा विस्तृत आढावा घेतला. मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे हा तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी यड्रावकर यांनी बैठकीमधूनच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधत वस्तुस्थिती विशद केली व रेमडेसिविरचा पुरवठा करण्याबाबत संबंधितांना आपणाकडून सूचना द्याव्यात, असा आग्रह धरला. यावेळी टोपे यांनी एक-दोन दिवसांत राज्यासह प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या पाहून मागणीनुसार रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची ग्वाही दिली. तसेच कोविड प्रतिबंधक लसही सुरळीतपणे मिळेल असे सांगितले. त्याचबरोबर कोरोना व्हॅक्सिन लसीचा पुरवठासुद्धा नियमित केला जाईल, असे सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना घुणकीकर यावेळी उपस्थित होत्या.