लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारपासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून दिव्यांग बांधवांतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.
आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ, शेतकरी व विधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरोधात शुक्रवारपासून अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधिस्थळ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिव्यांग बांधवांनीही आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. शासनाकडून जोपर्यंत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयांवर कार्यवाही करून सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती यांनी तीन टक्के अपंग निधी तातडीने वितरित करावा. दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे ६०० रुपये मानधन वाढवून १५०० रुपये करण्यात यावे. मानधनाकरिता २१००० रुपये असणारी उत्पन्नाची अट शिथिल करून एक लाख रुपये करावी, त्याचबरोबर दिव्यांगांना समप्रमाणात मानधन वितरित करावे. दिव्यांगांना कर्जमाफी देऊन दिव्यांग वित्त महामंडळाच्या कर्जाबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात. दिव्यांग-अव्यंग योजनेचे प्रोत्साहन अनुदान वाढवून एक लाख रुपये करावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात देवदत्त माने, संदीप दळवी, अफजल सरकार, संजय जाधव, रामचंद्र वडेर, अविनाश केकरे, आशितोष डोंगरे, आदींसह दिव्यांग सहभागी झाले होेते. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.