नेसरी : येथील निराधार गंधवाले कुटुंबीयांना २१ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. येथील रवळनाथ हौसिंग को-ऑपरेटिव्ह संस्थेत संस्थाध्यक्ष आर. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते मार्तंड कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम झाला.
सामाजिक कार्यकर्ते व ‘लोकमत’चे वार्ताहर रवींद्र हिडदुगी यांच्या पुढाकाराने ही रक्कम जमा झाली होती. मदतीबाबत अधिक माहिती देताना हिडदुगी म्हणाले, २००८ मध्ये येथील श्रीमती विजयमाला गंधवाले या दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या गरीब महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या पाच ते दहा वयाच्या ५ लहान मुली अनाथ झाल्या. आधीच या मुलींच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे या ५ नातींची जबाबदारी वृद्ध आजीवर आली.
दरम्यान, या कुटुंबाची व्यथा ‘लोकमत’ने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. या वृत्ताची दखल घेऊन गडहिंग्लजचे प्रतिष्ठित व्यापारी कै. रावसाहेब कित्तूरकर यांच्या कुटुंबीयांनी ५ हजारांची मदत दिली. सहकाऱ्यांना घेऊन आणखी ५ हजारांची आर्थिक मदत गोळा केली व झालेल्या मदतीची ठेव पावती करण्यात आली.
संबंधित ठेवीचे सहा-सात वर्षांपूर्वी २० हजार ४०० रुपये झाले. त्यापैकी १०४०० रुपये इंदूबाई गंधवाले यांना एका कार्यक्रमात देऊन उर्वरित १० हजार रुपये येथील रवळनाथ को-ऑप हौसिंग संस्थेत परत ठेवण्यात आले.
संबंधित रक्कम नुकतीच दुप्पट झाली. दरम्यान याच कार्यक्रमात आर. बी. पाटील, मार्तंड कोळी यांनी मिळून १ हजाराची मदत जाहीर केली. अशी एकूण २१ हजारांची मदत आजी इंदूबाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी आर. बी. पाटील-कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. नेसरीकर अमोल बागडी यांनी स्वागत केले. अभिजित कुंभार यांनी आभार मानले. या वेळी व्यवस्थापक किरण कोडोली, सुरेश गवळी, उमेश दळवी आदींची उपस्थिती होती.
---------------------
फोटो ओळी : नेसरीतील निराधार गंधवाले कुटुंबाला २१ हजारांची रोख आर्थिक मदत सुपूर्दप्रसंगी माजी प्राचार्य आर. बी. पाटील, मार्तंड कोळी, रवींद्र हिडदुगी, अमोल बागडी, उमेश दळवी, अभिजित कुंभार, सुरेश गवळी आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-०३