Maharashtra Assembly Election 2019 : ‘नवं कोल्हापूर’साठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या : ज्योतिरादित्य सिंधिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 03:54 PM2019-10-18T15:54:34+5:302019-10-18T16:12:43+5:30
रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.
कोल्हापूर : रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला केले.
जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात त्यांनी तरुणाईशी संवाद साधला.
येथील हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया हॉलमधील या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, बाजीराव खाडे, प्रतिमा सतेज पाटील, काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते.
रोजगारनिर्मिती करणे दूरच राहिले, उलट भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील २२२० उद्योग बंद पडले असल्याची टीका ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. मुंबई-बंगलोरमधील ‘स्वीट पॉट’ हे कोल्हापूर आहे. येथे कृषीप्रक्रिया उद्योगांसाठी चांगली संधी असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील.
‘मिशन रोजगार’ घेवून आलेल्या ऋतुराज या नवयुवकाला संधी द्या, त्याच्या कार्यक्षमतेतून ‘नवं कोल्हापूर’ निर्माण होईल. आपल्या सर्वांची साथ, पाठबळावर ऋतुराज हा नक्की आमदार होईल, असा मला विश्र्वास आहे. चांगले भविष्य घडवायचे असेल, तर इतिहास विसरु नका. भीती आणि चिंता मनातून काढून उत्सुकता, धैर्य बाळगा. शिक्षणाला अनुभवाची जोड देवून इतिहास लक्षात घेवून वर्तमानात राहून भविष्य घडवा, असे आवाहन सिंधिया यांनी केले.
या कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांच्या ‘मिशन रोजगार’ संकल्पपत्राचे सिंधिया यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सुमारे पाच हजार युवक-युवती संघटीत झालेल्या ‘फ्रेंडस आॅफ ऋतुराज’ या मोहिमेचा बँड प्रतिनिधीक युवक-युवतींनी सिंधिया यांना बांधला. यावेळी पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, आदींसह तरुणाई उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. महादेव नरके, राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले.