लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’विरोधात दूध दरवाढीसाठी आपण आंदोलने केली आणि वाढ पदरात पाडून घेतली. मात्र, ‘गोकुळ’ एवढा दूध दर देणारा देशात दुसरा संघ नाही, सत्तारूढ गटाचा कारभार आणि त्यांनी मल्टीस्टेट न करण्याच्या दिलेल्या शब्दावरच राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील इतर दूध संघांनी दूध नाकारले, काहींनी १५ ते १६ रूपये दराने दूध खरेदी केले. मात्र ‘गोकुळ’ने एकाही शेतकऱ्याचे दूध नाकारले नाही, उलट प्रतिलीटर २७ रूपयाने खरेदी केले. दूध उत्पादकांप्रति असलेली प्रामाणिक भावना लक्षात घेत आपण त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, संजय घाटगे, अरूण नरके, प्रा. जालंदर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, अजित पवार, राजेंद्र गड्ड्यान्नवर उपस्थित होते.
१० लीटर धार काढणारा उमेदवारच नाही
दहा लीटर दुधाची धार काढणाऱ्याला पाठिंबा देणार, असे राजू शेट्टी यांनी पूर्वी स्पष्ट केले होते. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता, दोन्ही पॅनलमध्ये दहा लीटर दुधाची धार काढणारा एकही उमेदवार नाही, मग पाठिंबा कोणाला द्यायचा, असे म्हणताच नेते मंडळींनीही हसून दाद दिली.
परिस्थितीनुसार भूमिका बदलावी लागते
एकेकाळी आपण ‘गोकुळ’विरोधी आंदोलन केल्याबाबत विचारले असता, ज्या-त्यावेळची ती भूमिका असते. चुकीचा कारभार केला तर यांच्याविरोधातही बोलत राहूच, मात्र आपणाला ‘अमूल’शी स्पर्धा करायची आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ मजबूत होणे ही काळाची गरज असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
‘पी. एन. महाडिक’ हेच माझे नेते
जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनीही सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला. चार दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत विरोधी आघाडीला पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता, ते चुकीचे आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे आपले कर्तव्य असते. मात्र, पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक हेच माझे नेते असल्याचे चराटी यांनी सांगितले.