कोल्हापूर : उद्योग-व्यापार, आदी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी महत्त्व कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दिल्ली व मुंबईतील अधिकारी तसेच विमान कंपन्यांसमवेत मी चर्चा केली आहे. कोल्हापूरला विमान सेवा सुरू करण्यास प्राधिकरणासह मुंबईमधील सुप्रीम एअरवेजने तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आवश्यक प्रवासी संख्येच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक, व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी पाठबळ दिल्यास ४५ दिवसांत येथील विमान सेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज, रविवारी दिली.कोल्हापूरची विमान सेवा सुरू करण्याबाबतचे प्रयत्न आणि येथील उद्योग, व्यावसायिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योगपती मोहन मुल्हेरकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, रवींद्र तेंडुलकर, आशिष रायबागे, योगेश कुलकर्णी, अभिजित मगदूम, मिलिंद धोंड, आदी उपस्थित होते.खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरची विमानसेवा २०११ पासून बंद आहे. त्याचा परिणाम येथील उद्योग, व्यवसाय, आदी क्षेत्रांवर होत आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक मेहता यांच्याशी तसेच सुप्रीम एअरवेज आणि एअर एशिया या विमान कंपन्यांशी चर्चा केली. त्यात मेहता यांनी विमानसेवा सुरू करा, अन्य सुविधांची पूर्तता करू, असे सांगितले. त्यासह ‘सुप्रीम’ने प्रवासी संख्येची अट घालून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यात १२ सीटर विमानासाठी ४, १८ सीटरसाठी ६, ३६ सीटरसाठी ८, तर ४२ सीटरसाठी १० प्रवासी रोज देणे आवश्यक आहे. सध्या पहिले पाऊल म्हणून १२ सीटर विमानाची सेवा सुरू करता येईल. त्यासाठी चार प्रवासी देणे फारसे अवघड ठरणारे नाही. त्यासाठी औद्योगिक, व्यावसायिक, सराफी अशा विविध संघटनांनी पाठबळ दिल्यास ४५ दिवसांत विमान सेवा सुरू करता येईल. त्यादृष्टीने संघटनांनी जबाबदारी घ्यावी. त्याचा आढावा घेण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊ. विमानतळासाठीची वनीकरण व काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन, रन-वे वाढविणे आदींबाबत पाठपुरावा केला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर विमानसेवेसाठी ‘सुप्रीम’ तयार
By admin | Published: June 23, 2014 12:47 AM