कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या नूतन उपसभापती सुरेखा शहा यांना दोनवेळा समन्स पाठवूनही त्या चौकशीसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बेटिंग प्रकरणात आरोपी केले आहे. उद्या, गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यादिवशी त्या हजर न झाल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सुरेखा प्रेमचंद शहा यांच्या फ्लॅटमध्ये गुंड स्वप्निल तहसीलदार, जवाहर चंदवानी, गोपी आहुजा, कन्हैया कटियार हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना आढळले होते. फ्लॅटमध्ये बेटिंग घेण्यास संमती दिल्याप्रकरणी शहा यांना दोनवेळा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नसल्याने पोलिसांनी त्यांना आरोपी केले आहे. उद्या गुरुवारीही चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांना अटक केली जाईल, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बेटिंग प्रकरणात सुरेखा शहा आरोपी
By admin | Published: April 06, 2016 12:55 AM