इचलकरंजी : येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील शिक्षा व दोषित्वाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने विधानसभा निवडणुकीची त्यांची उमेदवारी वैध ठरविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर इचलकरंजी विधानसभा निवडणूक रिंगणात राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मदन कारंडे, माकपचे सदाशिव मलाबादे, शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांच्यासह १७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी येथील प्रांताधिकारी कार्यालयात आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. त्यावेळी आमदार हाळवणकर यांच्या अर्जावर मलाबादे व बालमुकुंद व्हनुंगरे यांनी हरकत घेतली. वीज चोरी प्रकरणात हाळवणकर यांना दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवावा, अशा आशयाच्या दोन्ही हरकती होत्या. या हरकतीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांच्यासमोर सुमारे तीन तास सुनावणी चालली. मलाबादेंच्या वतीने अॅड. जयंत बलुगडे, व्हनुंगरे यांच्यावतीने अॅड. कोलगुट, अॅड. स्वानंद कुलकर्णी, तर आमदार हाळवणकर यांच्यावतीने अॅड. गणेश सोवनी, अॅड. सुहास मुदगल व अॅड. भरत जोशी यांनी युक्तिवाद केला. अॅड. सोवनी म्हणाले, वीज चोरी प्रकरणात आमदार हाळवणकर यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असली तरी त्यावर उच्च न्यायालयाने ११ जूनला शिक्षेला आणि २१ जुलैला दोषित्वाला स्थगिती दिली आहे. तसेच १९ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रात, एखाद्या लोकप्रतिनिधीचे कोणत्याही गुन्ह्यातील दोषित्वाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असेल, तर त्या लोकप्रतिनिधीला निवडणुकीसाठी उभे राहता येईल, असे स्पष्ट केले आहे. हाळवणकर यांच्यावतीने अॅड. सोवनी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून हाळवणकर यांच्या विरोधात देण्यात आलेल्या दोन्ही हरकती फेटाळल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार हाळवणकर यांना वीज चोरीप्रकरणी दोषी ठरवून ३ मे रोजी विशेष न्यायालयाने निकाल दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल लागल्याने हाळवणकर यांना निवडणुकीसाठी उभे राहता येणार की नाही, याबाबत गेले पाच महिने राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा होती. त्यामुळे हाळवणकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिला जाणारा निकाल ऐकण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोठी गर्दी झाली होती. निकाल लागताच आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी केली. (प्रतिनिधी)
सुरेश हाळवणकर अखेर पात्र
By admin | Published: September 30, 2014 12:57 AM