श्रीनिवास नागे-- सांगली --पडझडीमुळे रडकुंडीला आलेली राष्ट्रवादी, मुसंडी मारण्याच्या तयारीतील भाजपा आणि त्याचा फायदा उठवत जिल्हा परिषदेची सत्ता खेचण्यासाठी आसुसलेली काँग्रेस यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वत्र रंगतदार लढती होतील. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांना घेरण्यासाठी झाडून सगळे विरोधक एकवटले आहेत, मात्र कोठे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली छुपी हातमिळवणी, तर कोठे गड सांभाळण्यासाठी बनवलेल्या स्थानिक आघाड्या यामुळे साऱ्या राजकारणाची खिचडी झाली आहे.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सुत्रे जयंतरावांच्या हाती एकवटले असली तरी आर. आर. यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना यश आलेले नाही. योग्य समन्वयाअभावी जत, खानापूर आणि पलूस, कडेगाव या तालुक्यांतील नेत्यांनी भाजपला जवळ केले. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी जयंतरावांना आटापिटा करावा लागत आहे. महिन्यापूर्वी काँग्रेसची खुमखुमी जिरवण्याची भाषा करणाऱ्या जयंत पाटील यांनी या आठवड्यात काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी दोन पावले मागे जात नमते घेतले! कारण काँग्रेससह सगळ्यांनीच त्यांना घेरण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वत:चा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ वाळवा व मिरज तालुक्यांत विभागला आहे. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा आहेत. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांना घेरण्याची चाल यशस्वी झाल्यानंतर जि.प., पंचायत समिती निवडणुकीतही विरोधकांनी तीच खेळी खेळण्याचे पक्के केले आहे. त्यासाठी वाळवा आणि मिरज पूर्वभागात काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शिवसेनेसह वाळव्याच्या नायकवडी गटाची हुतात्मा आघाडी एकत्र आली.काही दिवसांपूर्वी सांगलीच्या ‘बीजेपी’ला ‘जेजेपी’ (जयंत जनता पार्टी) असे हिणवले जात होते. मात्र आता ‘जेजेपी’तील मंडळीच जयंत पाटील यांच्याविरोधात उघड बोलू लागली आहेत. त्यातील काहींनी तसा शड्डूच ठोकल्याने शिराळा, पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांतील जागा मिळवून भाजप जिल्हा परिषदेत खाते उघडण्याच्या तयारीत आहे. अशी झाली आहे खिचडी!स्वबळावर लढण्याची भाषा करणारी काँग्रेस वाळवा आणि मिरज पूर्वभागात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेनेला सोबत घेणार आहे, तर शेजारच्या शिराळ्यात चक्क राष्ट्रवादीशी केलेली गट्टी कायम ठेवणार आहे. खानापूर-आटपाडीतही आघाडीची बोलणी सुरू आहेत. जतमध्ये काँग्रेसचा एक गट भाजपा आणि जनसुराज्य शक्तीसोबत निघाला आहे.पलूस-कडेगावमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा गळ्यात गळे घालण्याची शक्यता दिसत आहे. मिरज पश्चिममध्ये भाजपाच्या अजितराव घोरपडे गटाशी त्यांची सोयरीक झाली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसच्या पतंगराव गटाशी त्यांनी संधान सांधले आहे.वाळवा, शिराळा, पलूस, कडेगावमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासगाव-कवठेमहांकाळमध्ये त्यांच्याशी पंगा घेतला आहे.
जयंतरावांना घेरण्याची खेळी
By admin | Published: January 28, 2017 11:25 PM