दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरिता स्थानिक आरोग्य कमिटीने प्रभागानुसार स्वतंत्र कमिटी स्थापन करून प्रत्येक घरातील व्यक्तींच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे. याकरिता सरपंच रफीक कलावंत, पोलीसपाटील कविता कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष अमोलदत्त कुलकर्णी यांनी अग्रभागी राहत प्रभागानुसार गट स्थापून प्रत्येक घरातील आरोग्याविषयी व कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णांची शोधमोहीम उघडली आहे. यासाठी येथील स्थानिक शल्यविशारद व मेडिकल असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे समुदाय आरोग्याधिकारी प्रदीप बुधे, आरोग्यसेवक संदीप कुंभार, आरोग्यसेविका शबाना हवालदार, शकिला गोरवाडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य हे विशेष परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, येथील लसीकरण केंद्रावर काही स्थानिक व स्वयंघोषित नेते आपल्याजवळच्या व्यक्तीस लस देण्यास प्राथमिकता द्यावी, याकरिता आरोग्य पथक कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालत असल्याने, नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.