कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिराच्या किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याचा सर्वेक्षण अहवाल आठ दिवसांत महापालिका प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला सादर करणार असल्याचे समितीतील सदस्य व केआयटी महाविद्यालयाचे स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रा. किशोर हिरासकर यांनी मंगळवारी सांगितले.महाद्वार ते रंकाळा चौपाटी या रस्त्यावर असलेल्या किरणोत्सव मार्गाची त्यांनी पाहणी केली. किरणोत्सव मार्गावरील येणाऱ्या उंच इमारती, पाण्याच्या टाक्या अशा अडथळ्यांचे समितीने पाहणीवेळी चिन्हांकन केले. दरम्यान, महापौर अश्विनी रामाणे यांनी दुपारी अंबाबाई मंदिरात समितीतील सदस्यांची भेट घेतली. त्यावेळी किरणोत्सव मार्गावरील अडथळे दूर करण्याबाबत निश्चितच प्रयत्न करीन व पाहिजे ते सहकार्य समितीला केले जाईल, असे आश्वासन महापौर रामाणे यांनी दिले.शनिवारी (दि. १६) पासून श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यामधून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. समितीतील सदस्य केआयटी महाविद्यालयाचे स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रा. किशोर हिरासकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गेल्या चार दिवसांपासून काम करीत आहे. मंगळवारी दिवसभरात महाद्वार ते रंकाळा चौपाटी या मार्गावरील किरणोत्सव मार्गात येणाऱ्या इमारतीची पाहणी, त्या मार्गावरील येणारे अडथळे यांची पाहणी ‘टोटल स्टेशन’या उपकरणाच्या साहाय्याने केली. हिरासकर यांच्यासमवेत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, केआयटीचे प्रा. शीतल वरूर, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे विद्युत अभियंता सुरेश देशपांडे, आदींनी पाहणी केली. त्याचबरोबर दुपारी महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, नगरसेविका वृषाली कदम, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आदी पदाधिकारी आले. यावेळी अश्विनी रामाणे यांनी महाद्वारवरून ‘टोटल स्टेशन’ या उपकरणामधून पाहणी केली. यावेळी प्रा. किशोर हिरासकर यांनी महाद्वार ते रंकाळा चौपाटी या किरणोत्सव मार्गाची पाहणी करून ज्या ठिकाणी अडथळे आहेत, त्याचे चिन्हांकन केले. यावेळी केआयटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, आदी उपस्थित होते.
किरणोत्सव मार्गाचा सर्वेक्षण अहवाल आठ दिवसांत
By admin | Published: January 20, 2016 1:03 AM