कोल्हापूर : सर्व्हे होऊन तीन महिने उलटले, तरी कोल्हापूरमधील पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. तातडीने मदत देण्याबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही एक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार पूरग्रस्त व्यावसायिक आणि व्यापाºयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी (दि. ९ नोव्हेंबर) केली आहे.आॅगस्टमधील महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक अशा विविध घटकांना बसला. शहरातील व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क, शाहूपुरी, आदी परिसरातील ज्या पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांनी विमा उतरविला होता, अशा विमाधारकांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश शासनाने विमा कंपन्यांना दिले होते. त्यानंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतर विमा कंपन्यांच्या सर्व्हेअर यांनी पूरबाधित क्षेत्रातील दुकानांचा सर्व्हे करून त्यांची छायाचित्रे काढून नेली.
सर्व्हेअर यांच्याबरोबरच संबंधित व्यापारी, व्यावसायिकांनी नुकसानभरपाईपोटीच्या रकमेबाबतचा अहवाल विमा कंपन्यांना सादर केला. मात्र, त्यातील एका कंपनीच्या शाहूपुरी शाखेतील अधिकारी नुकसानभरपाईची रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची तक्रार पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांकडून झाली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
अशा स्थितीत विमा रक्कम महत्त्वाचा आधार ठरणारी आहे. ती देण्याबाबत विमा कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. याबाबत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या व्यापारी, व्यावसायिकांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जाणीवपूर्वक त्राससाहित्य खरेदीची बिले अथवा कोटेशनची मागणी करून या विमा कंपनीतील अधिकारी भरपाई देण्याबाबत असमर्थता दाखवत आहेत. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, नागाळा पार्क परिसरात पुराचे पाणी चार दिवस होते. त्यामध्ये सर्व प्रकारची कागदपत्रे नष्ट झाली आहेत. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना तसे निदर्शनास आणून दिले आहे. पूरग्रस्तांना तत्काळ मदत देण्याबाबत शासनाचे आदेश असूनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची तक्रार या पूरग्रस्त व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी केली आहे.‘कोल्हापूर चेंबर’शी संपर्क साधावापूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांना विम्याची रक्कम मिळाली आहे. ज्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही, त्यांनी ‘कोल्हापूर चेंबर’च्या कार्यालयात संपर्क साधावा. आपली माहिती द्यावी. त्यांना विम्याची रक्कम मिळवून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरुवारी केले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- जिल्ह्यातील पूरबाधित व्यापारी, उद्योजकांची संख्या : सुमारे तीन हजार
- विमा रक्कम मिळालेल्यांचे प्रमाण : सुमारे ७० टक्के
- विमा रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे प्रमाण : सुमारे ३० टक्के