कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडीत स्थलांतरित झालेल्या धान्यबाजारात अवजड वाहनांना तसेच व्यापारी व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन दिले. त्यांनी, मंगळवारी (दि. १२) या भागात पाहणी करण्याचे आश्वासन दिले.लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडी येथे धान्य बाजाराचे स्थलांतर झाले. टेंबलाईवाडी धान्य बाजाराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यावर टेंबलाईवाडी विद्यालय, बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या दोन शाळांसह दाट लोकवस्ती आहे. येथील रस्त्याला तीव्र उतार असल्याने वाहनावरील चालकांचा ताबा सुटून अपघाताची शक्यता आहे.
त्यामुळे हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरून धान्य बाजाराकडे वळणाऱ्या रस्त्यावर मोठे वर्तुळ (सर्कल) करावे, अवजड वाहनांसह धान्य बाजारात ये-जा करणाऱ्यांसाठी रस्त्याची सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले.यावेळी सरनोबत यांनी, मंगळवारी (दि. १२) या रस्त्याबाबत जाग्यावर जाऊन सर्व्हे करू, त्यानंतर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, शशी बिडकर, पोपट दांगट, दिनेश परमार, धनाजी यादव, दिलीप देसाई, आदींचा सहभाग होता.