विनोद सावंतकोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविणारेच असुरक्षित आहेत. महापालिकेतील अग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची ही स्थिती आहे. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. रिक्त जागांवर कायम करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.महापालिकेमध्ये सर्वांत प्रभावीपणे काम करणारा विभाग म्हणून अग्निशमन दलाची ओळख आहे. मात्र, या विभागात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेलेली नाही. यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. केवळ ३० कर्मचारी कायम असून, ठोक मानधन, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा डोलारा आहे.पगार कमी, जोखमीचे काम११८ पैकी ५८ कर्मचारी ठोक मानधनावरील आहेत. भविष्यात कायम होईल, या आशेने ते जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी महापूर आल्यानंतर १७ जणांचा जीव वाचविला. चांगले काम केल्याबद्दल ठोक मानधनावरील कर्मचाºयांना वेतनवाढ करण्याचा निर्णय झाला. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. पगार कमी आणि जोखमीचे काम अशी त्यांची स्थिती आहे. पद मंजूर पदे रिक्त पदे
- स्थानक अधिकारी ३ २
- वाहनचालक ३२ २५
- टेक्निकल इन्स्ट्रक्टर १ १
- तांडेल २१ ५
- फायरमन १०८ ७९
- अटेंडंट १४ ११
ठोक मानधनावरील कर्मचारी
- फायरमन - ४०
- वर्कशॉपकडील ठोक मानधन - ६
- केएमटीकडील ठोक मानधनावरील वाहनचालक - १२
रिक्त जागांवर कायम करण्यासाठी साकडेअग्निशमन दलाकडे १२२ रिक्त जागा असून या जागेवर ठोक मानधनावरील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करा, अशी मागणी जोर धरत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडे कायम करण्यासाठी साकडे घातले.
किमान वेतनही नाहीअग्निशमन दलातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. केवळ १० हजार रुपये पगार असून कपात होऊन आठ हजार रुपयेच त्यांच्या हातात मिळतात. यामध्ये घरखर्च चालविणार कसा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. कमी कर्मचारी असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना डबल ड्यूटीही करावी लागते. कायम करण्याची मागणी केल्यास आस्थापनावर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.