प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त भाविक व यात्रेकरूंनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर मोठ्या संख्येने स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. ग्रहण काळात पुरुष व महिलांनी नदीच्या पाण्यात राहून जपजाप्य केले. हवामान स्वच्छ असल्याने शाळेतील मुले व तरुणांनी गॉगल व एक्सरे फिल्मच्या साह्याने सूर्यग्रहण पाहिले.सूर्यग्रहणानिमित्त आज, सकाळी ४.३० वाजता मंदिरात काकड आरती व षोडशोपचार पूजा संपन्न झाली. दुपारी ४.५७ वाजता ग्रहण स्पर्श व सायंकाळी ६.३० वाजता ग्रहण मोक्षचे श्रीना स्नान घालणेत आले. त्यानंतर श्रीचे चरणकमलावर महापूजा करणेत आली व महापूजे नंतर धूप, दिप, आरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला. रात्रो ९.३० नंतर शेजारती करण्यात येणार आहे.दरम्यान ग्रहण पर्वकाल स्नान करणेसाठी परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्यातून तसेच कर्नाटक व गोवा राज्यातूनही अनेक भाविक दाखल झाले होते. ग्रहण पर्वकालात जपजाप्य अनुष्ठान व धार्मिक पुस्तकांचे वाचन केल्याने पुण्य प्राप्ती होते अशी अनेकांची श्रद्धा असल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर भाविकांनी गर्दी केली. ग्रहण पर्वकाल संपलेनंतर असंख्य भाविकांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या गजरात नदीत स्नान करून श्री चरणाचे दर्शन घेतले.दत्त देव संस्थानमार्फत दर्शनरांग, मुखदर्शन, तसेच नदी किनारी सुरक्षा रक्षक, कापडी मंडप, सीसीटीव्ही कॅमेरा आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी व सचिव संजय नारायण पुजारी यांनी सांगितले. नावाडी संजय गावडे व अरुण गावडे यांनी नदीकाठी सुरक्षितेसाठी आपली नाव तैनात ठेवली होती.
Surya Grahan 2022: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी, ग्रहण काळात नदीत केले जपजाप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 6:59 PM